वार्ताहर /धामणे
वैष्णव सदन आश्रम येळ्ळूर-धामणे ते पंढरपूर पायी दिंडीचे मंगळवार दि. 28 रोजी सकाळी येळ्ळूर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
प. पू. तुकाराम महाराज मुरगोड यांच्या कृपाशीर्वादाने आणि दिंडीचालक मारुती महाराज सांबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल-रखुमाई मंदिर आवारात पालखीचे पूजन ग्रा. पं. सदस्य प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वीणा पूजन ग्रा. पं. माजी सदस्य तानाजी हलगेकर, तुळसी पूजन रमेश धामणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. दिंडीचे अध्यक्ष बाळू केरवाडकर व सेक्रेटरी अजित पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
आज काकती सिद्धश्वर मंदिरात महाप्रसाद
दिंडी येळ्ळूर गावभर फिरून वैष्णव आश्रम येथे प. पू. गुरुवार्य तुकाराम महाराज मुरगोड यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर अवचारहट्टी, देवगणहट्टी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात पोहोचली. येथे दुपारचा महाप्रसाद घेऊन मासगौंडहट्टी, कुरबरहट्टी, धामणे येथून रात्री जुने बेळगाव येथील कलमेश्वर मंदिरात मुक्काम झाला. बुधवार दि. 29 रोजी काकती सिद्धेश्वर मंदिरात दुपारी महाप्रसाद घेऊन पुढे मार्गस्थ होणार आहे. दिंडीत पंचक्रोशीतील वारकरी आणि महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत.









