विम्बल्डन टेनिस स्पर्धा ः केर्बर, अल्कारेझ, रूड, फोकिना, अँडी मरे यांचेही विजय, वावरिंका पराभूत
वृत्तसंस्था/ लंडन
सेंटर कोर्टवर झालेल्या पहिल्या सामन्यात विद्यमान विजेत्या नोव्हॅक जोकोविचने विम्बल्डनमधील 80 व्या विजयाची नोंद करताना द.कोरियाच्या सूनवून क्वॉनवर मात केली. याशिवाय ऑन्स जेबॉर, केर्बर, रॅडुकानू, सिनर, कार्लोस अल्कारेझ, अँडी मरे, कॅस्पर रूड, फोकिना यांनीही विजयी सलामी दिली तर वावरिंका, हुरकाझ, म्लाडेनोविक यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांत 80 किंवा त्याहून अधिक विजय नोंदवणारा जोकोविच हा पहिला टेनिसपटू बनला आहे. त्याने चार सेट्सच्या लढतीत क्वॉनवर 6-3, 3-6, 6-3, 6-4 अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. पॅरिसमधील स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर जोकोविचचा हा पहिलाच सामना होता. विम्बल्डनमध्ये त्याने आता सलग 22 सामने जिंकले आहेत. तो ही स्पर्धा सलग चौथ्यांदा जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याची पुढील लढत कोकिनाकिस किंवा कामिल माश्चरझॅक यापैकी एकाशी होईल. ब्रिटनच्या नवव्या मानांकित कॅमेरॉन नोरीने स्पेनच्या पाब्लो अँडय़ुअरवर 6-0, 7-6 (7-3), 6-3 अशी मात केली. दुसऱया फेरीत त्याची लढत स्पेनच्या जॉम मुनारशी होईल. 19 वर्षीय युवा खेळाडू कार्लोस अल्कारेझने पाच सेट्सच्या रोमांचक लढतीत जर्मनीच्या जॅन लेनार्ड स्ट्रफवर 4-6, 7-5, 4-6, 7-6 (7-3), 6-4 अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. चार तास 11 मिनिटे ही लढत रंगली होती. अल्कारेझ हा या स्पर्धेत खेळत असलेला सर्वात युवा खेळाडू आहे.

सिनरचा ग्रास कोर्टवर पहिला विजय
ब्रिटनचा माजी अग्रमानांकित अँडी मरेनेही विजयी सुरुवात करताना जेम्स डकवर्थचा 4-6, 6-3, 6-2, 6-4 असा पराभव केला. 20 व्या मानांकित जॉन इस्नेरशी त्याची पुढील लढत होईल. इस्नेरवर त्याने याआधीच्या आठही सामन्यात विजय मिळविलेला आहे. इटलीच्या दहाव्या मानांकित यानिक सिनरने ग्रास कोर्टवरील पहिला विजय नोंदवत दुसरी फेरी गाठली. त्याने स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंकाचे आव्हान 7-5, 4-6, 6-3, 6-2 असे संपुष्टात आणले. मागील वर्षी त्याने या स्पर्धेत भाग घेतला होता. पण पहिल्याच फेरीत त्याला पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळीही या स्पर्धेच्या आधी झालेल्या ग्रासकोर्टवरील इस्टबोर्न स्पर्धेतही त्याला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता.
जेबॉर, रॅडुकानू दुसऱया फेरीत
महिला एकेरीत तिसऱया मानांकित टय़ुनिशियाच्या ऑन्स जेबॉरने पात्रता फेरीतून आलेल्या मिरियम बॉर्कलुंडवर विजय मिळविताना केवळ चार गेम्स गमविले. याआधी तिने प्रेंच ओपन स्पर्धा जिंकली असून सलग दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी ती उत्सुक झाली आहे. याशिवाय ऍलिसन रिस्के अमृतराज व माया च्वालिन्स्का यांनीही विजय मिळविले. ब्रिटनची अग्रमानांकित व येथे दहावे मानांकन मिळालेल्या एम्मा रॅडुकानूने ऍलिसन व्हान उत्वान्कवर 6-4, 6-4 असा विजय मिळविला.
केर्बर विजयी, हदाद पराभूत

2018 मध्ये ही स्पर्धा जिंकलेल्या जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने फ्रान्सच्या क्रिस्टिना म्लाडेनोविकवर 6-0, 7-5 अशी मात करीत आगेकूच केली. याशिवाय काया जुवानने यावर्षीची ग्रास कोर्टवरील अव्वल खेळाडू 23 व्या मानांकित बियाट्रिझ हदाद माइयाला 6-4, 4-6, 6-2 असा पराभवाचा धक्का दिला. हंगेरीच्या दाल्मा गाल्फीशी तिची पुढील लढत होईल. गाल्फीने ऑस्ट्रेलियाच्या मॅडिसन इंग्लिसचा 5-7, 6-3, 6-4 असा सव्वादोन तासात पराभव केला.
कॅस्पर रूडचा विम्बल्डनमध्ये पहिला विजय
स्पेनच्या अलेजांड्रो डेव्हिडोविच फोकिनाने पोलंडच्या सातव्या मानांकित हय़ुबर्ट हुरकाजचे आव्हान पहिल्याच फेरीत 7-6 (7-4), 6-4, 5-7, 2-6, 7-6 (10-8) असे संपुष्टात आणले. विम्बल्डनमध्ये अंतिम सेटमधील टायब्रेकर दहा गुणांचा केला असून दहा गुणांचा टायब्रेकर सेट जिंकणारा फोकिना हा पहिला टेनिसपटू बनला आहे. या सामन्यात पावसाचा दोनदा व्यत्यय आला होता. त्याची दुसरी लढत जिरी व्हेसेलीशी होईल. तिसऱया मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रुडने विम्बल्डनमध्ये पहिल्या विजयाची नोंद करताना स्पेनच्या अल्बर्ट रामोस व्हिनोलासचा 7-6 (7-1), 7-6 (11-9), 6-2 असा पराभव केला. यापूर्वी दोनदा त्याला या स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच पराभव पत्करावे लागले होते.
मारिन सिलिक, बेरेटिनी यांची कोरोनामुळे माघार
माजी उपविजेत्या क्रोएशियाच्या मारिन सिलिकने कोरोनाची लागण झाल्याने विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेतली. 33 वर्षीय सिलिकने 2014 मध्ये यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती. पाच वर्षापूर्वी त्याने या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. पण फेडररने त्याचा पराभव करून जेतेपद मिळविले होते. इन्स्टाग्रामवर त्याने आपली कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले.
इटलीच्या आठव्या मानांकित मॅटेव बेरेटिनीनेही याच कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतली आहे. कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यानेही इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले. बेरेटिनी मागील वर्षी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोकोविचकडून पराभूत झाला होता. येथे त्याचा पहिला सामना चिलीच्या क्रिस्तियन गॅरिनविरुद्ध होणार होता. त्याच्या जागी स्वीडनच्या इलियास वायमरला प्रमुख ड्रॉमध्ये स्थान देण्यात आले आहे.
जॉडी बरेज हरली, पण मने जिंकली
या स्पर्धेत वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेली ब्रिटनची जॉडी बरेज महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाली असली तरी तिने आपल्या संवेदनशील कृतीने प्रेक्षकांची मने जिंकली. युपेनच्या लेसिया त्सुरेन्कोविरुद्ध तिला 6-2, 6-3 असा पराभव पत्करावा लागला. मात्र या सामन्यावेळी एका बॉलबॉयला चक्कर आल्याने तो खाली बसला. बरेजचे त्याच्याकडे लक्ष जाताच तिने त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला आपल्या बॅगमधून पाणी व एक गोड पदार्थ खावयास देत मदत केली. ते घेतल्यानंतर त्याला थोडे बरे वाटू लागले. ‘तो अचानक पॅनिक झाला असावा. कारण मीही अशा अनुभवातून गेली आहे,’ असे तिने सांगितले. तिच्या या संवेदनशील कृतीवर प्रेक्षकांनी तिचे कौतुक केले. ब्रिटनच्या 17 खेळाडूंना या स्पर्धेत स्थान देण्यात आले असून बरेज ही त्यापैकी एक आहे.









