86,824 कोटी रुपयांची गुंतवणूक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुधारीत विशेष प्रोत्साहन पॅकेज योजनेच्या अंतर्गत 31 मे 2022पर्यंत 86,824 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसंबंधीच्या एकूण 314 प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामध्ये बॉश ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लि.च्या 596 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा समावेश आहे.
चालू महिन्याच्या 24 तारखेला सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार 31 मे 2022 पर्यंत 89,232 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 320 प्रस्ताव विचारात घेतले आहेत. यामध्ये 86,824 कोटी रुपयांच्या 314 प्रस्तावांना हिरवा कंदील दिला आहे.
सरकारने जुलै 2012 मध्ये सुधारीत विशेष प्रोत्साहन पॅकेज योजना(एम-सिप) ला मंजुरी दिली होती. याला ऑगस्ट 2015 आणि जानेवारी 2017 रोजी संशोधीत केले होते. कागदपत्रानुसार 31 मे 2022 रोजीच्या आकडेवारीनुसार 114 प्रस्तावांना 1,774.47 कोटी रुपयांची प्रोत्साहन रक्कम वितरीत केली आहे.
प्रोत्साहन योजनेकरीता विविध कंपन्यांनी आपले प्रस्ताव पाठवले होते. ज्यामध्ये सॅमसंग, एलजी, बॉश्च, तेजस नेटवर्क, मदरसन सुमी सिस्टम्स, टाटा पॉवर एसइडी, विप्रो जीई हेल्थकेअर यांचे अर्ज दाखल झालेले आहेत.









