ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिंदे गटाने पाठिंबा काढल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. या सरकारविरोधात आता भाजप नव्हे तर बच्चू कडू यांची प्रहार संघटना विश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
बंडखोर शिंदे गटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भाजपसोबत येण्याची विनंती केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांचा प्रस्ताव अद्याप स्विकारलेला नाही. उलट मुख्यमंत्री ठाकरेच बंडखोर आमदारांना परत येण्याची विनंती करत आहेत. मात्र, बंडखोर भाजपसोबत जाण्यावर ठाम आहेत. आमदारांच्या या बंडामागे भाजपचा हात असल्याचे सांगण्यात येते. शिंदे गटाच्या बंडानंतर भाजपकडून उघडपणे भूमिका घेतल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका वाढल्या आहेत.
दरम्यान, शिंदे गटाने पाठिंबा काढल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले आहे. प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे येत्या दोन दिवसात राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र देणार आहेत. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी मुख्यमंत्री ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला सांगू शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.









