ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंडखोरी करत शिवसेनेत उभी फूट पाडली. शिवसेनेवर आलेल्या या संकटाला तोंड देणारे खासदार संजय राऊत यांना आता ईडीने समन्स बजावले आहे. या समन्सवरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘हिसाब तो देना पडेगा’ अशा शब्दात राऊत यांना डिवचले आहे.
किरीट सोमय्या यांनी राऊत यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रिय संजय राऊत साहेब, तुम्ही मला, माझ्या पत्नीला, मुलाला, किंवा आईला कोणालाही जेलमध्ये टाकायचे प्रयत्न करा. धमक्या द्या, हल्ले करा, शिव्या द्या… परंतु “हिसाब तो देना पडेगा”,
पत्राचाळ जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरुन सोमय्यांनी हे खोचक ट्विट केलं आहे. मध्यंतरी राऊत आणि सोमय्या यांच्यातील वाद टोकाला गेला होता.
दरम्यान, ED च्या समन्सनंतर संजय राऊत यांनीही एक ट्विट करत भाजपला खुलं आव्हान दिलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “मला आताच समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या..मला अटक करा! जय महाराष्ट्र!” राऊत यांनी हे ट्विट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.