पिंपळगाव / वार्ताहर
राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचे पडसाद आज पिंपळगाव (ता. भुदरगड ) येथे उमटले. येथील शिवसेना संपर्क कार्यालयासमोर उपतालुकाप्रमुख अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पोस्टर लावून घोषणाबाजी करत सर्व बंडखोर आमदारांचा निषेध व्यक्त केला.
आज सकाळी उपतालुकाप्रमुख अशोकराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले. शिवसैनिकांनी शिवसेना संपर्क कार्यालयासमोर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोठे पोस्टर उभे करण्यात येऊन घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना अशोकराव पाटील यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार आजच्या निषेध सभेचे आयोजन केले असल्याचे सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना धोका देऊन गुवाहाटी येथे जाऊन बसलेल्या सर्व बंडखोर आमदारांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. सर्व शिवसैनिक शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे असून यापुढेही नव्या जोमाने कामाला लागू असे शिवसैनिकांडून सांगण्यात आले.
यावेळी दशरथ तेलवेकर, नारायण शेवाळे यांची भाषणे झाली. यावेळी विभागप्रमुख सचिन कातकर, शाखाप्रमुख अंकुश पाटील अनेक शिवसैनिक उपस्थित होते.