ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एकनाथ शिंदे यांच्या गटाने सरकारचा पाठिंबा काढला आहे. त्यामुळे अल्पमतात आलेले सरकार सावरण्यासाठी महाविकास आघाडीकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. प्रवीण राऊत आणि पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना हे समन्स बजावण्यात आले असून, उद्या (दि.28) त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संजय राऊत यांना ईडीचे समन्स आल्याचे समजताच त्यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मला आताच समजलं ईडीने मला समन्स पाठवलं आहे. छान. महाराष्ट्रात मोठय़ा घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठय़ा लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या, मला अटक करा! जय महाराष्ट्र!”
शेवटच्या वाक्यात “या मला अटक करा!” अशा शब्दात राऊत यांनी संताप व्यक्त करत भाजपला खुलं आव्हान दिलं आहे. तसेच हे ट्विट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग करण्यात आले आहे.