संवेदनशील खाण पिटांची पुन्हा होणार तपासणी
प्रतिनिधी/ पणजी
अफाट आणि अमर्याद पाणी साठवून ठेवणाऱया खाण पिटांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आधीच प्रचंड पाणीसाठा असलेल्या या पिटामध्ये आता मुसळधार पावसामुळे आणखी पाणी भरू लागले असून एखादी अप्रिय घटना घडल्यास हाहाकार माजण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे सरकारने आता संवेदनशील खाण पिटांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 28 पासून हे काम सुरू होणार आहे.
उत्तर गोव्यात सर्वाधिक खाणी डिचोली तालुक्यात असून सांखळी, वाळपई, डिचोली या मतदारसंघात त्यांचा विस्तार आहे. त्यापैकी डिचोली, मुळगाव, शिरगाव, होंडा, सोनशी, वेळगे, पाळी आदी भागात मोठमोठय़ा खाणी चालत होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या सर्व खाणी बंद पडल्या आहेत. खाणी सुरू असताना तेथील पिटमध्ये जमा होणारे पाणी पंपद्वारे नियमित बाहेर काढण्यात येत होते. सध्या गेल्या कित्येक वर्षांपासून सर्व व्यवहार थांबल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याचे कामही खाण कंपन्यांनी थांबवले होते.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर काही दिवसांपूर्वीच सरकारने आदेश जारी करून खाण कंपन्यांना खाणींवरील ताबा सोडण्यास सांगून लीजा ताब्यात घेतल्या होत्या. परंतु नंतर खाण पिटांमधील पाण्याचा निचरा करण्याचे काम स्वतःकडून होणार नसल्याची जाणीव सरकारला झाली. त्यामुळे पुन्हा नव्याने आदेश जारी करून पाण्याचा निचरा करण्याचे काम हाती घेण्यास खाण कंपन्यांना सांगितले.
या प्रकारामुळे खाण कंपन्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यासंबंधी त्यांनी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, सरकारने आता येत्या मंगळवार 28 जूनपासून संवेदनशील खाण पिटांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरकारने यापूर्वीच स्थापन केलेले तज्ञांचे पथक पाण्याची पातळी तपासणार आहे. त्यानुसार डिचोली, मुळगाव, शिरगाव, अडवलपाल येथील खाण पिटांची तपासणी करण्यात येणार असून त्याचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे.