बेंगळूरच्या दोन पर्यटकांचे मृतदेह सापडले, दोघांचा शोध सुरू
प्रतिनिधी/ कारवार
जिल्हय़ातील कुमठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाड समुद्र किनाऱयावर शनिवारी चार पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. यापैकी दोन पर्यटकांचे मृतदेह आढळून आले आहेत. तर अन्य दोन पर्यटकांचा शोध घेण्यात येत आहे. चैतश्री आणि अर्जुन यांचे मृतदेह आढळून आले आहेत. तर समुद्रात बुडालेल्या किरणकुमार आणि तेजस यांचा शोध घेण्यात येत आहे.
बेंगळूर येथील खासगी कंपनीत सेवा बजावणारे काही कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसमवेत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी कुमठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाड येथील समुद्र किनाऱयावर शनिवारी दाखल झाले होते. पर्यटकांची एकूण संख्या 89 इतकी होती. किनाऱयावर पर्यटनाचा आनंद लुटताना काही पर्यटकांना अरबी समुद्रात पोहण्यासाठी उतरण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे काही पर्यटक समुद्रात उतरून लाटांच्या विळख्यात सापडले. तत्पूर्वी स्थानिक नागरिकांनी पर्यटकांना समुद्रात न उतरण्याचा सल्ला दिला होता. पर्यटक समुद्रात गटांगळय़ा खात आहेत हे लक्षात येताच वकील गणेश नाईक, गुरुनंद नाईकसह अन्य काही स्थानिकांनी समुद्रात उडी घेऊन काही पर्यटकांना वाचविले. तथापि ते चैतश्री, अर्जुन, किरणकुमार आणि तेजस यांना वाचवू शकले नाहीत.
घटनेची माहिती मिळताच किनारपट्टी रक्षक दलाचे आणि कुमठा पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. गंभीर अवस्थेत चैतश्री हिला उपचारासाठी रुग्णालयाकडे नेताना तिचा मृत्यू झाला आणि अर्जुन याचा मृतदेह आढळून आला. समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या किरणकुमार आणि तेजस यांचा शोध घेण्यात येत आहे. किनारपट्टी रक्षक दल आणि कुमठा पोलिसांनी शोधकार्य सुरू ठेवले आहे. कुमठा पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या इशाऱयाकडे दुर्लक्ष
किनारपट्टीवर वाऱयासह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने समुद्र खवळला आहे. त्यामुळे हवामान खात्यासह कारवार जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना समुद्र किनाऱयाकडे न फिरकण्याचा सल्ला आणि इशारा दिला आहे. तथापि इशाऱयाकडे दुर्लक्ष करीत बेंगळूर येथील पर्यटक समुद्रात उतरले होते.