13 पैकी 8 मतांनी सुशांत शेलार अध्यक्षपदी; राजेभोसलेसह पाच संचालकांची बैठकीला अनुपस्थिती
कोल्हापूर प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची 13 पैकी 8 मतांनी पदावरून दुसऱ्यांदा उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या ठिकाणी सुशांत शेलार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेलार अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणार आहेत. तर दुसरीकडे कोल्हापुरातील हॉटेल केट्री येथे झालेली बैठक बेकायदेशीर असल्याची लेखी तक्रार राजेभोसले यांनी न्यायालयात केली आहे. त्यामुळे या बैठकीला राजेभोसले यांच्यासह पाच उमेदवार उपस्थित नव्हते.
चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर म्हणाले, चित्रपट महामंडळाचा खोटा ऑडीट रिपोर्ट मेघराज राजेभोसले आणि खजिनदार संजय ठुबे यांनी धर्मदाय आयुक्तांकडे सादर केला आहे. कार्यकारिणीला विश्वासात न घेता तयार केलेल्या ऑडीट रिपोर्टमध्ये लाखो रूपयांची अफरातफर केली आहे. कार्यकारिणीला विश्वासात न घेता 50 लाखाची एफडी मोडली आहे. तसेच पुण्यातील एका जागेसंदर्भात अडीच लाख रूपयांचा चेक एका व्यक्तीला दिला आहे. यासंर्भातील माहिती कार्यकारिणीला दिलेली नाही. अफरातफर केलेल्या पैशांची चौकशी व्हावी आणि संबंधीत दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार नूतन अध्यक्ष शेलार व उपाध्यक्ष यमकर पोलीसात करणार आहेत. तसेच चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीचा कालावधी संपूण 20 महिने झाले तरी एकही कार्यकारिणीची बैठक मेघराज राजेभोसले यांनी घेतलेली नाही, असा आरोपही यमकर यांनी केला.