वाहनचालकांना होतोय त्रास : फांद्या तोडण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी बेळगाव शहर आणि परिसरात सिग्नलांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी सिग्नल बंद अथवा कुचकामी झाल्याचे प्रकार पहावयास मिळतात. काही ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहेत मात्र ते सुरूच करण्यात आले नाहीत, असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वाहतूक नियम कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, आरटीओ कार्यालयासमोर सिग्नल बसविण्यात आला आहे. मात्र तो सिग्नल झाडाच्या फांदीत झाकोळला गेल्याने त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव शहरातील अनेक ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. आरटीओ कार्यालयासमोर बसविण्यात आलेला सिग्नल झाडाच्या फांदीत झाकोळला गेल्याने नागरिकांना सिग्नल सुरू आहे की बंद आहे, हेच समजत नाही. परिणामी या ठिकाणी रिक्षा स्टँड आहे. त्यामुळे साहजिकच याकडे दुर्लक्ष होत असते. अशा प्रकारामुळे अनेकवेळा नियमांची पायमल्ली होत असते. सिग्नलसमोरील फांद्या हटवाव्यात, अशी मागणी केली जात आहे.
शिवाजीनगरकडून येणाऱया कोपऱयावर हा प्रकार घडला आहे. मागील अनेक महिन्यांपासून या ठिकाणचे दोन्ही बाजूचे सिग्नल हे झाडांच्या फांदीमध्ये झाकले गेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांचा मोठा गोंधळ उडत आहे. आरटीओ कार्यालय असल्याने या ठिकाणी नागरिकांची वर्दळ अधिक असते. याचबरोबर येथील वाहनचालकांना सिग्नल दिसत नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहे.
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नल व पोलिसांची नियुक्ती केली जाते. मात्र आरटीओ सर्कलजवळ पोलीस उभे असले तरी सिग्नल दिसत नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. तेंव्हा तातडीने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व सिग्नलजवळील फांद्या हटवाव्यात, अशी मागणी होत आहे.









