चार दुचाक्यांना ठोकर देऊन पळ काढण्याच्या प्रयत्नात : गांधी चौकात दोघां दुचाक्यांना ठोकर,एक गंभीर जखमी
प्रतिनिधी /म्हापसा
खोर्ली म्हापसा डीएमसी कॉलेजकडून म्हापशाच्या दिशेने अलिशान गाडीने येणाऱया अंजली रेड्डी नामक महिलेने दुचाकांना ठोकर देत पळ काढण्याच्या प्रयत्नात असतानाच दोघां युवकांनी प्रसंगवधानाले धाव घेऊन त्या महिलेला अखेर म्हापसा गांधी चौकात अडविण्यात यश मिळविले. सदर महिला नशेत होती असे प्राथमिक अंदाजातून कळाले असून तिला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तिच्या रक्ताचे नमुने काढण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप आला नसल्याची माहिती हवालदार महेश शेटगावकर यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार होंडा हुंडाई गाडी TS 12-E P-3455 ने अंजली रेड्डी नामक महिला खोर्ली येथील लक्ष्मी लाँड्री जवळ आपल्या स्प्लेंडर दुचाकी क्रमांक GA-03-B-6165 ने दिलीप देऊ सावंत (रा. कुचेली म्हापसा) याला ठोकर दिली. पुढे जाऊन आपल्या मुलाला घेऊन जाणाऱया रुपेश नार्वेकर याला ठोकर दिली व पळ काढला असता पुढे जाऊन अन्य एकाला ठोकर दिली. अखेर काही युवकांनी तिचा पाठलाग करीत म्हापसा गांधी चौक येथे तिला अडविले.
घटनेची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व तिला ताब्यात घेऊन म्हापसा पोलीस स्थानकात नेण्यात आले त्यानंतर जिल्हा आझिलो इस्पितळात दाखल करून तिच्यावर तपासणी सुरू होती. हवालदार महेश शेटगावकर यांनी घटनेचा पंचनामा केला. याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. त्या महिलेने अमली पदार्थाचे सेवन केले होते असा कयास असला तरी वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. गाडीत गांजा होता असे बोलले जात असून अपघातानंतर तिने बाहेर फेकून दिला असल्याचे येथे सांगण्यात आले. याबाबत निरीक्षक परेश नाईक यांना विचारले असता तो तंबाखू होता असे ते म्हणाले. ती महिला मुळ तेलंगना येथील असून सध्या ती हरमल येथे राहत असल्याचे सांगण्यात आले.









