मागील काही लेखांमध्ये टिन एज या वयामध्ये होणारे अनेक शारीरिक, मानसिक बदल, मुलांमधील-पालकांमधील अस्वस्थता, उद्भवणाऱया अनेक समस्या, पालक पाल्य नातेसंबंध अशा अनेक गोष्टी आपण विस्तृतपणे पाहिल्या. परंतु गेल्या लेखामधे म्हटल्याप्रमाणे जीवनाची वाटचाल करत असताना वयाचे हे टप्पे, होणारे बदल असणारच आहेत परंतु त्याचबरोबर झपाटय़ाने बदलणारे जग, आकार घेणाऱया नवनवीन संकल्पना, जीवनामधे येणारे मोहाचे, आकर्षणाचे, नैराश्याचे क्षण, वेगवेगळय़ा टप्प्यांवर उद्भवणारे ताण तणाव हे देखील असणारच आहे. त्यांना तोंड देण्यासाठी मात्र अधिक सजगतेने मुलांना सक्षम करणे आवश्यक आहे. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसोबतच त्यांच्या मनाच्या मशागतीच्या दृष्टीने जागरुक असणे गरजेचे आहे. त्यासाठी सजगतेची तंत्रे आत्मसात करणे आवश्यक आहे. सजगतेच्या छोटय़ा छोटय़ा तंत्राचा अवलंब करत त्यात सातत्य ठेवले तर लक्ष देण्याचे आणि ते हवे तिथे नेण्याचे कौशल्य विकसित होऊ शकते.
सजगता तंत्रांचा सराव अर्थात माईंडफुल टेनिंगमधील मेंदूच्या छोटय़ा छोटय़ा व्यायामाने ‘बिईंग इन दी झोन’ राहणे जमू लागते, विचार आणि कृती यामधला फरक नीट समजू लागतो, स्वतःला थांबविण्याचे कौशल्य विकसित करता येते. अंध प्रतिक्रिया देण्याची सवय, आवेगी वर्तन कमी होते.
सजगता, अवधान म्हणजेच माईंडफुल राहणे
माईंडफुलनेस अर्थात सजगतेची तंत्रे यासाठी खूप उपयुक्त ठरतात. ‘सजगता ध्यानाने’ सतत प्रतिक्रिया करण्याची सवय बदलता येते. त्याच्या नियमित सरावाने भावनांची जाण येते. या वयात भावनांचा आवेग जबरदस्त असतो. त्यामुळे काही वेळा आवेगी वर्तनही घडते. भावनांच्या प्रवाहात वाहण्याऐवजी स्वतःला थांबवता येण्याचे कौशल्य निर्माण होते. ‘सजगता ध्यान’ हे माईंडफुलनेसचे टूल खूपच उपयुक्त ठरते. सजगता ध्यान म्हणजे काय ते कसे करायचे हे आपण बघणारच आहोत परंतु त्यापूर्वी ‘ध्यान’ म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. कारण आपल्याकडे ध्यान हा शब्द आध्यात्मिक साधना, उपासना, मोक्षप्राप्ती इ. गोष्टींसोबत जोडला गेल्याने अनेकांना तो गूढ वगैरे वाटतो परंतु त्यात गूढ वाटावे असे काही नाही.
आपला मेंदू इतर प्राण्यांपेक्षा विकसित असल्याने फक्त माणूसच ध्यानाची अवस्था अनुभवू शकतो. पहा, इतर प्राण्यांना परिसराचे भान उत्तम असते. कारण त्यांची इंद्रिये माणसाच्या इंद्रियांपेक्षा तीक्ष्ण असतात. आपण नेहमी म्हणतो ना, जरा खुट्ट झालं तरी कुत्रा मांजर लगेच सावध होतात, ती यामुळेच. परंतु मेंदूतज्ञांच्या मते निओ कॉरटेक्स, प्री प्रंटल कॉरटेक्स हा मेंदूचा पुढील भाग त्यांच्यामधे विकसित झालेला नसतो. त्यामुळे त्यांना आत्मभान नसते. सोप्या भाषेत सांगायचे तर सर्व प्राणी जागरुक (aware) असतात परंतु त्यांना आत्मभान (self-awareness) नसते. ते वैशिष्टय़ मानवाकडे असल्यानेच तो स्वतःचे ध्येय ठरवून त्यानुसार वाटचाल करू शकतो, भविष्याचे नियोजन करू शकतो. आत्मभानामुळे आपण मनातील विचार भावना यांचे भान ठेवू शकतो. हेच भान जपणे किंवा जाणत राहणे हेच ध्यान! एखादी कृती जाणीवपूर्वक करणे म्हणजे ध्यान असे म्हणता येईल. पहा हं. आपण बोलताना एखाद्याला सांगतो, अमुक एखादे काम ध्यान देऊन कर.. लक्षपूर्वक कर..म्हणजे काय तर जेव्हा आपण एखादी कृती ध्यान देऊन म्हणजेच लक्षपूर्वक करतो त्यावेळी ती यांत्रिकतेने होत नाही. नाहीतर बऱयाच गोष्टी, कृती आपण यांत्रिकतेने करत असतो. उदा. अंघोळ, दात घासणे, जेवणे, अगदी गाडी चालवतानाही काहीवेळा तसे होते. म्हणजे आपण हाताने ती कृती करतो परंतु मन तिथे नसते ते विचारांमागे पळत असते. कोणतीही गोष्ट आपण पहिल्यांदा करायला शिकतो तेव्हा ती लक्षपूर्वक करतो. आपला मेंदू त्यामधे गुंतलेला असतो. उदा. सुरुवातीला गाडी शिकताना आपले सगळे लक्ष तिथेच असते. पुढे सराव झाल्यानंतर मेंदू ते काम आपल्या सहकाऱयांकडे डेलिगेट करतो अर्थात मज्जारज्जूकडे सोपवतो. कारण विचार करणे हे मानवी मेंदूचे अधिक महत्त्वाचे काम आहे. सरावाची कृती झाल्यावर तसे केले गेले नाही तर आपण नवीन कोणतीही गोष्ट शिकू शकणार नाही. त्यामुळे ते नैसर्गिक रीतीने घडत असते. म्हणजेच कृतीची सवय झाली की ती यांत्रिकतेने घडू लागते. त्यामुळे अनेकदा कृती सुरू राहते आणि मन मात्र भूतकाळ, भविष्य यातच पळत राहते.
त्यामुळे मानसिक दमणूक तर होतेच आणि काहीवेळा विचार आणि वास्तव यातले भान रहात नाही. जाणीवपूर्वक लक्ष देण्याने अर्थात ध्यानाने विचारांच्या प्रवाहात वाहणे थांबते.
ज्यावेळी कोणतीही भावनिक प्रतिक्रिया येत असते तेव्हा आपला भावनिक मेंदू काम करत असतो. सतत अशा प्रतिक्रिया करत राहण्याच्या सवयीमुळे राग, चिंता, नैराश्य अशा विघातक भावनांची वारंवारता वाढत जाते. हळूहळू या भावना तीव्र होऊ लागतात. भावनिक मेंदूतील अमाय्गडला हा भाग खूप उत्तेजित होतो आणि आपल्या वैचारिक मेंदूला काम करण्याची संधी मिळतच नाही. त्यामुळे अंध प्रतिक्रिया आणि बेभान कृती घडतात.
ध्यानामुळे हे बदलता येते. सततच्या विचारांच्या गर्दीत वहात जायची मेंदूची सवयही आपल्याला बदलता येते. बऱयाचदा अती विचार करण्याच्या सवयीमुळेच तणाव निर्माण होतात. तणावमुक्तीसाठीही सजगता ध्यानाचे तंत्र खूपच उपयुक्त ठरते. सजगता ध्यान म्हणजे माझे शरीर आणि मन यांच्याप्रती साक्षीभाव वाढवायचा. शरीरातील संवेदना, मनातील भावना साक्षीभावाने पहायच्या; पण याचा अर्थ जबाबदारी नाकारायची आणि आनंदाचा, सुखाचा त्याग करायचा असे नाही. तर ज्यावेळी एखादी परिस्थिती, गोष्ट बदलता येत असेल त्यावेळी ती कर्ता होऊन बदलायची, आनंददायी गोष्टीचा आनंद ‘भोक्ता’ होऊन घ्यायचा आणि ज्या गोष्टी वा परिस्थिती आपल्या अवाक्मयाबाहेरची आहे त्यावेळी पॅनिक न होता ‘साक्षी’ होण्याचा प्रयत्न करायचा. सततच्या सरावातून आणि योग्य मार्गदर्शनातून हे कौशल्य आत्मसात करता येऊ शकते.
सजगतेची विविध तंत्रे आत्मसात केल्याने शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य निकोप राहण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता चांगल्या पद्धतीने विकसित होण्यासाठी मदत होईल हे मात्र निश्चित!
-ऍड. सुमेधा संजीव देसाई








