जागतिक बाजारात उत्साह ः माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये विक्री
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक तेजीत राहिल्याचे दिसून आले. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 934 अंकांवर झेपावला. जागतिक बाजारांमध्ये सकारात्मक कल राहिल्याने मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये विक्री राहिल्याने बाजारात मजबूत तेजी राहिल्याचे दिसून आले.
आज सकाळपासूनच शेअर बाजाराचा कल हा तेजीकडे होता. सकाळी बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक यांनी तेजीसह सुरूवात केली होती. ही सुरूवातीपासूनची तेजी कायम ठेवत मुख्य 30 कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 934.23 अंकांनी वधारत 1.81 टक्क्यांसोबत निर्देशांक 52,532.07 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 288.65 अंकांनी वधारुन तो 15,638.80 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये टायटन, स्टेट बँक, टीसीएस, डॉ. रेड्डीज लॅब, टाटा स्टील, विप्रो, इन्फोसिस, आयटीसी आणि टेक महिंद्रा यांचे समभाग प्रामुख्याने तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला फक्त नेस्ले इंडियाचे समभाग काही प्रमाणात घसरणीत राहिले आहेत.
जगातील बाजारांमध्ये आशियातील अन्यर बाजारांपैकी जपानचा निक्की, दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि हाँगकाँगचा हँगसेंग यांचे निर्देशांक लाभात राहिले. तर चीनचा शांघाय कम्पोझिट घसरणीसोबत बंद झाला आहे. यासह युरोपीय बाजारात दुपारपर्यंत तेजीचा कल राहिला होता.
मंगळवारी प्रामुख्याने देशातील व जगातील बाजारांमध्ये होणारी विक्री थांबल्याने शेअर बाजाराला दिलासा मिळाला आहे. यामुळे तेजी निर्माण झाली असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. तसेच चलन वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदर वाढ करण्यामधील अनिश्चितता याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. कच्चे तेल 1.57 टक्क्यांच्या तेजीसोबत 115.9 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.









