नवी दिल्ली
भांडवली बाजार नियामक सेबी यांनी म्युच्युअल फंडांना पुन्हा विदेशी समभागांमध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे. सदरच्या गुंतवणूकीसाठी सात अब्ज अमेरिकन डॉलर्सची रक्कम मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
जानेवारीत म्युच्युअल फंडांना जागतिक बाजारात मंदी आल्याने विदेशी समभागात घसरण दिसली होती तेव्हा गुंतवणूक थांबवण्याची सूचना केली होती. म्युच्युअल फंडांनी दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिकची गुंतवणूक करण्यास सुरूवात केल्याने सेबीने तातडीने यासंबंधी फंडांना सतर्क करत अधिक गुंतवणूक न करण्याचे आवाहन केले होते. विदेशातील समभाग घसरणीत राहिल्याने सेबीने याबाबत सुचवले होते.
आता सेबीने हे निर्बंध हटवले असून म्युच्युअल फंडांना विदेशी समभागात गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. पण हे करताना 7 अब्ज डॉलर्सची मर्यादा ओलांडू नये, असेही सेबीने फंडांना स्पष्ट केले आहे.









