पहिली पत्नी करत नाही भांडण
माणसाच्या आयुष्यात विवाह हा अत्यंत महत्त्वाचा सोहळा असतो. विवाहाच्या बंधनाला अत्यंत पवित्र मानले जाते. विशेषकरून हिंदूंमध्ये विवाहाचे मोठे महत्त्व असते. भारताच्या कायद्यातही हिंदू धर्मानुसार एकच विवाह करण्याची अनुमती आहे. परंतु भारतातील एका ठिकाणी पुरुष सहजपणे दुसरा विवाह करत आहे. संबंधित व्यक्तीची पत्नी गरोदर असेल तरच या विवाहाला अनुमती मिळते. हा विवाह एका विशेष उद्देशाने केला जात असतो.
सात जन्मापर्यंत सोबत राहण्याचा आणाभाका घेणारा पती पत्नी गरोदर राहताच दुसरा विवाह करतो. तरीही पत्नी किंवा समाज त्याला कुठलीच दुषणे देत नाही. यामागे कारण आहे पाण्याचे. या पाण्यामुळेच गरोदर पत्नी आनंदाने स्वतःच्या पतीचा दुसरा विवाह लावून देते.

पाणी आणण्यासाठी दुसरी पत्नी
ही अजब प्रथा राजस्थानच्या बाडमेर जिल्हय़ात आहे. येथील देरासर गावात शतकांपासून एक अजब प्रथा पाळली जात आहे. या गावात कुठल्याही व्यक्तीची पत्नी गरोदर राहिल्यास तेव्हा तो त्वरित दुसरा विवाह करतो. या विवाहाबद्दल त्याची पत्नी किंवा गावातील कुणालाच आक्षेप नसतो. या भागात पाण्याची मोठी टंचाई असल्याने महिला दूरदूरवून पाणी आणत असतात. परंतु महिला गरोदर राहताच ती पाणी भरू शकत नसल्याने पुरुष दुसरा विवाह करतो.
पत्नी करत नाही विरोध
या भागात पुरुष घरातील कामं करत नसल्याने महिलांनाच पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करावी लागते. पत्नी गरोदर राहिल्यावर घरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पती दुसरा विवाह करतो. या विवाहाबद्दल पहिल्या पत्नीला कुठलीच नाराजी नसते.









