नगरसेवक धंनजय जांभळे यांच्यासह नागरिकांची मुख्याधिकाऱयांकडे आर्जव
प्रतिनिधी/ सातारा
मान्सून सुरु व्हायला आला तरीही अजून सातारा शहरातील प्रमुख रस्त्यावरील खड्डे मुजवले गेले नाहीत. तब्बल दहा वेळा पालिकेला अर्ज दिले, तोंडी मागणी केली तरीही सुद्धा खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले गेले नाही. त्यामुळे सोमवारी सायंकाळी माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांच्यासह नागरिकांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांची भेट घेवून साहेब उपकार करा आमच्यावर पण तेवढे खड्डे भरा अशी हात जोडून विनंती मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे करण्यात आली. बापट यांनीही दोन दिवसात खड्डे भरतो असे आश्वासन दिले आहे.
सातारा शहरातील मोती चौकापासून चॉदणी चौक, राजधानी टॉवर, मंगळवार तळे रोड, फुटका तलाव रोड, समर्थ मंदिर रोड आदी ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे पडल्याने अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. त्याबाबत माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांनी पालिकेच्या बांधकाम विभागाकडे सातत्याने पत्र व्यवहार केला आहे. अर्जविनंत्या करुन रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. तरी सुद्धा खड्डे बुजवण्यात येत नसल्याने सोमवारी सायंकाळी 4 वाजता माजी नगरसेवक धनंजय जाभंळे यांच्यासह मनोज पवार, सुरेश बादापुरे, गौरव शिंदे, बाबर यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्य अभियंता दिलीप चिद्रे हेही उपस्थित होते. त्यांनी साहेब मी तुमच्याकडे दहा वेळा अर्ज देवून खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे.
मोती चौक, चाँदणी चौक, फुटका तलाव, मंगळवार तळे रोड, राजधानी टॉवर, समर्थ मंदिर रोड येथील खड्डे बुजवण्याचे पत्र दिले आहे. साहेब आमच्यावर उपकार करा पण तेवढे खड्डे भरा, पाऊस सुरु झाल्यावर खड्डे भरता येणार नाहीत. दिवाळीमध्येच काम करावे लागणार तोपर्यंत खड्डे मोठे होणार अपघात अनेक घडणार, अनेक वाहने खराब होणार तत्पूर्वी खड्डे भरा, अशी विनंती केली. त्यावर मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दोन दिवसात खड्डे भरुन घेतले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.









