गोव्यात पहिल्यांदाच होणार रोबोटचा वापर
प्रतिनिधी /मडगाव
भारतातील सर्वात मोठी समस्या म्हणजे ‘मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग’चा व्यवसाय. ही प्रथा थांबवण्यासाठी कायदे केले गेले असले तरी, मानवी सफाई कामगारांना आजही मेनहोल्समध्ये प्रवेश करणे आणि हाताने साफ करणे भाग पडत होते. पण, आत्ता हे काम रोबोट करणार आहे. गोव्यात रोबोट मॅनहोल्सची सफाई करणार आहे.
ओएनजीसीने बँडीकूट नावाचा रोबोट सार्वजनिक बांधकाम खात्याला गिफ्ट केलेला आहे. त्याचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केले.
शिरवडे-नावेली येथे मलनिस्सारण प्रकल्पात या रोबोटचे उद्घाटन करण्यात आले. रोबोटची निर्मिती होण्यापूर्वी मलनिस्सारणच्या मॅनहोल्समध्ये समस्या निर्माण झाल्यास कामगारांना मॅनहोल्समध्ये उतरून त्याची सफाई करावी लागत होती. हे कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून खुपच धोकादायक होते. त्याला पर्याय म्हणून रोबोटची निर्मिती करण्यात आलेली आहे.
पंधरा राज्यांमध्ये वापर सुरु
बँडीकूट रोबोटचा वापर सर्वप्रथम केरळात करण्यात आला. त्यानंतर हैद्राबाद, कर्नाटक अशा एकूण 15 राज्यांनी त्याचा वापर सुरू झालेला आहे. गोव्यात प्रथमच रोबोटद्वारे मॅनहोल्सची सफाई केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना मॅनहोल्स आणि सेप्टिक टाक्मया स्वच्छ करण्यासाठी ‘तंत्रज्ञान अवलंबलेल्या पद्धती’चा आदेश जारी केला आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून मॅनहोल्सची सफाई करण्यासाठी रोबोटची निर्मिती केली आहे. या रोबोटची किंमत सुमारे 33 लाख रूपये आहे.
रोबोट उतरतो ‘मॅनहोल’मध्ये
रोबोटच्या मुख्य वैशिष्टय़ामध्ये, दिवसा आणि प्रकाशात काम करणारे चार प्रगत सीवर कॅमेरे वापरून मॅन्यूअल स्कॅव्हेंजिंग आणि सांडपाणी जागतिक दर्जाच्या पद्धतीने साफ करण्यासाठी संपूर्ण रोबोटिक सोल्यूशन समाविष्ट आहे. काम पूर्ण करण्यासाठी, रोबोट मॅनहोलच्या आत जातो आणि मानवी सफाई कामगाराच्या सर्व क्रिया पूर्ण करतो.
र्बॅंडीकूटमध्ये दोन रचना आहेत. एक म्हणजे हात आणि चार पाय असलेले रोबोटिक युनिट जे मॅनहोलमध्ये प्रवेश करते आणि स्वच्छता ऑपरेशन हाताळते. दुसरे नियंत्रण पॅनेल युनिट आहे जे मॅनहोलच्या बाहेर बॅँडीकूट नियंत्रित किंवा देखरेख करणाऱया व्यक्तीसह असते.
दिगंबर कामतांकडून समाधान व्यक्त
मॅनहोलची स्वच्छता करण्यासाठी रोबोट दाखल झाल्याने मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी समाधान व्यक्त करून आजपर्यंत ही कामे सफाई कामगारांना करावी लागत होती. बऱयाच वेळा कामगार काम करत असताना गुदमरून जात असे. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण व्हायचा. आत्ता रोबोटमुळे ही भीती दूर झाल्याचे त्यांनी सांगितले. या रोबोटचा वापर प्रभावीपणे केला पाहिजे असे मतही त्यांनी मांडले.
रोबोटचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी प्रशिक्षित कामगार वर्गाची जरूरी भासणार आहे. ज्यांनी या रोबोटची निर्मिती केलीय, त्यांनी कामगारांना प्रशिक्षण द्यावे, त्यानंतर अशा कामगारांची एक टीम रोबोटचा वापर करून मॅनहोलची सफाई करणार असल्याचे मंत्री नीलेश काब्राल यावेळी म्हणाले. 33 लाख रूपये खर्च करून घेतलेल्या या रोबोटचा वापर होणे तेवढेच आवश्यक आहे. मलनिस्सारण ही काळाची गरज आहे. दुर्गंधीमुळे मलनिस्सारण कुणालाही आपल्या घराजवळ नको असते. पण, आज तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्गंधीमुक्त मलनिस्सारण योजना पुरविण्यात येते. जनतेचे याकामी सहकार्य हवे आहे. लोकांनी मल्लनिस्सारण योजनेच्या जोडण्य़ा घेतल्या पाहिजे असे मंत्री काब्राल म्हणाले.









