अध्याय अठरावा
भगवंत परमभक्ती बद्दल सांगताना म्हणाले, जी पूर्ण सच्चिदानंदमय स्थिती, तिच्यामध्ये मी सहजगतीने सापडतो. तिचंच नाव माझी ‘परमभक्ती’ असे तू निश्चित जाण. ती माझी ‘चौथी भक्ती’ होय. तेथे देव आणि भक्त एक होऊन जातात, ऐक्मयस्वरूपानेच भजन घडते. ‘परमभक्ती’ प्रकट झाली की, प्रलयांतीसुद्धा पतन नाही कारण स्वरूपस्थितीच्या समसाम्यामुळे साधक मत्स्वरूपालाच पोचतात. गृहस्थ आपल्या धर्मांचे पालन करून आपले अंतःकरण चांगल्या तऱहेने शुद्ध करून माझे स्वरूप जाणतो आणि ज्ञानविज्ञानाने संपन्न होऊन लवकरच मला प्राप्त करून घेतो. स्वधर्माचे अनु÷ान केले म्हणजे रज आणि तम हे नाश पावतात. आणि अंतःकरण शुद्धसत्त्वयुक्त झाले म्हणजे तेथे माझे ज्ञान प्रकाशमान होते. माझे ज्ञान प्रकाशित झाले म्हणजे माझे भजनही फैलावते आणि भजनाचा विकास झाला म्हणजे मन संकल्प विकल्प सोडून देते.
विकल्पाचा त्याग झाला की विरक्ती उचंबळून येते व सर्व प्राणिमात्रांमध्ये परमात्म्याचाच भास होऊ लागतो. त्यामुळे ‘परमभक्ती’ विकास पावते.
परमभक्तीचा विकास झाला की माझ्या भक्ताला मत्स्वरूपाची प्राप्ती घडते. अशा प्रकारची आत्म्यामधीलच आत्मस्वरूपाची प्राप्ती भक्तांना स्वधर्मस्थितीने घडून येते, ‘नेति’ ‘नेति’ असे म्हणून श्रुतीही तेथून परत फिरतात. अशा स्वस्वरूपस्थितीला भक्त पोचतात. ह्याप्रमाणे मत्स्वरूप झाले म्हणजे संसाराचे कुंपण तुटून जाते. नामरूपाची वार्ता लुप्त होते व जन्ममरणाचे नावही शिल्लक राहात नाही. अशा प्रकारे स्वधर्माच्या आश्रयाने चालले असता मीपणाचे नावच पुसून जाते आणि मत्स्वरूपाशी समरस झाल्याने अनायासे ते मीच होतात. पूर्वी मी जीव होतो आणि आता शिव झालो, ह्याचीही आठवण राहात नाही. असा माझ्या भक्तांना माझा अनुभव येतो.
संसाराच्या अस्तित्वावरच पाणी पडते. तेथे पुनरावृत्ती कुठून ? अशी माझ्या भक्तांना माझी प्राप्ती होते. तात्पर्य, स्वधर्मेकरूनच माझी प्राप्ती होते हे लक्षात ठेव. मी तुला हा वर्णाश्रमांचे पालन करणाऱयांचा आचारधर्म सांगितला आहे. हे करताना जर तो माझ्या भक्तीने संपन्न असेल, तर त्याला खात्रीने मोक्षाची प्राप्ती होते. अत्यंत प्राचीनकाळापासून चालत आलेला जो स्वधर्माचार, जो खरोखर मोक्ष देणारा आहे. त्याच स्वधर्माचरणाने सकाम लोक स्वर्गादि लोकांची इच्छा करतात ! पण तो स्वर्ग मिळाला तरी तेथून मृत्युलोकावर जन्म घ्यावा लागतोच. ह्याप्रमाणे माझी भक्ती न करता लोक सकामपणाने स्वधर्म नासून टाकतात. ब्राह्मणाला हत्ती दान मिळाला तर ह्याला खावयाला कोणी घालावे असे म्हणून त्याला देऊन टाकतात आणि पोथ्या वहावयाला म्हातारा बैल घेतात. ह्याप्रमाणे बाह्मणलोक स्वधर्माची उपेक्षा करतात आणि स्वर्गात भिकेचे दाणे गोळा करावयाला जातात ! घरात कोणी कामधेनु आणून दिली तर ती आम्हाला पोसवत नाही म्हणून ताकाच्या मोबदल्यात तिला देऊन टाकतात पण त्यात आपली केवढी नागवण झाली हे त्यांना कळत नाही! त्याप्रमाणे मी ब्राह्मणांना गायत्री हा स्वतंत्र मंत्र दिला असता त्याची उपेक्षा करून भलतेच मंत्रतंत्र जपतात व अशुद्ध आचाराने वागतात ! ब्राह्मणलोक सौर, शाक्त, गाणपत्य, इत्यादि अनेक प्रकारच्या दीक्षा घेतात पण एकही जण गायत्रीचे अनु÷ान करत नाही ! गायत्रीचे अनु÷ान तर नाहीच, पण त्याहून विपरीत करतात. ते काय ? तर पैशासाठी गायत्रीमंत्राचे सारे श्रेयच विकत देतात ! गायत्री मंत्र घरात असून त्याचा भावार्थ कोणी धरत
नाहीत.
शस्त्रास्त्रांनी भरलेला खंबीर रथ असला, आणि त्यावर नेऊन भित्रा मनुष्य बसविला, तर रथ टाकून पळून जाणे ह्यातच तो सुख मानतो. कारण त्याला युद्ध करण्याचे मुळी सामर्थ्यच नसते. त्याप्रमाणे मी वेदरूपाने नारायण ब्राह्मणांच्या हृदयातच असता, त्याचा महिमा न जाणता वेदाचे केलेले पारायण विकून टाकतात ! स्वर्गफळाची इच्छा धरून अनेक प्रचंड यज्ञ करतात. तात्पर्य सकाम कल्पना ह्या स्वधर्माला स्वतःच बुडवितात.
क्रमशः







