शंभर वर्षे जुने झालेले घर पाडायचे ठरवले तेव्हा नव्वदीपर्यंत पोहचलेल्या आजी म्हणाल्या, ‘नववधू म्हणून वयाच्या नवव्या वषी या घरात उंबऱयावरचं माप ओलांडून आले. आता या घरातूनच उंबरठा पार करून परलोकवासी होईन. माझी अंत्ययात्रा निघाल्याशिवाय घर पाडायचं नाही.’ आजींच्या या हट्टापुढे घरातले सारे हतबल होऊन गप्प बसले. मनातून मात्र सगळे आजींच्या मरणाची वाट बघू लागले. ज्या घराने आजींना मुले, सुना, नातवंडे, पतवंडे आणि भरभरून लौकिक संपत्ती दिली त्याने समाधान मात्र दिले नाही. कारण त्यांचे अतृप्त मन. ज्या घरासाठी हाडाची काडे करून माणूस अहोरात्र झिजतो त्या घरात, देहाची चिमूटभर राख झाल्यावर उरलेली हाडे आणण्याची परवानगी शास्त्राने दिलेली नाही. त्या अस्थी बाहेर अंगणात कुठेतरी झाडाला लटकवून ठेवाव्या लागतात. हे कटू सत्य अंगी बाणवण्यासाठी सद्गुरूंची कृपा असावी लागते. देह ठेवण्यापूर्वी ‘मी’पणाने मरून जावे लागते. ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो जाहला सोहळा अनुपम्य’ असे म्हणत सदेह वैकुंठाला गेलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी निर्माण केलेल्या वाटेवरून पहिले पाऊल टाकावे लागते; तेव्हा कुठे जन्मोजन्मी साठवलेल्या वासनाबीजांना हळूहळू मुक्ती मिळते. संग्रही वृत्ती ही माणसाजवळ जन्मजातच असावी. नाशिवंत गोष्टींबरोबर जन्मजन्मांतरी सोबत करणारी वासनाबीजे आपण गोळा करीत आहोत याचे त्याला भान नसते. पूजनीय डोंगरे महाराज म्हणत, ‘नरदेह मिळूनही आत्मशोधाच्या आनंदाकडे न वळता माणूस मी आजोबा झाल्यावर डोळे मिटेन असे जेव्हा म्हणतो तेव्हा परमात्म्याला खूप वाईट वाटते आणि तो म्हणतो, अरेरे! माझे चुकलेच. आता याला पुढील जन्मात चार पाय देतो म्हणजे हा लवकरात लवकर आजोबा-पणजोबा होईल.’ पशूंना आजोबा ही बढती लवकर मिळते ना! वासनेनुसार निसर्ग पुढील जन्म देतो. एखादी स्त्री अपत्य होण्याची तीव्र इच्छा मनात ठेवून पंचत्व पावली तर तिला एकाच वेळी आठ पिल्लांना जन्म देणाऱया उंदराच्या जन्माला तो परमेश्वर घालू शकतो. वासनाबीज रुजून पुन्हा पुन्हा त्याच जन्ममरणाच्या खाईत पडायला वेळ तो कुठला?
संत नामदेव महाराज म्हणतात, ‘बहुत जन्माशेवटी तुजशी झाली भेटी। बहु मी हिंपुटी झालो थोर’.. पांडुरंगा, अनेक जन्म झाले. शरणागताला तू सुखी केलेस अशी तुझी कीर्ती ऐकत आलो पण तुझ्या नामाकडे चित्त लागले नाही, त्यामुळे खूप दुःख सहन करीत विटंबना झाली. अन्याय झाला. या जन्मी तू भेटलास. ‘नामा म्हणे केशवा । एक उरली वासना । घ्यावी नारायणा चरणसेवा ।।’ ही वासना जन्मबीजाचे दहन करणारी आहे हे संत नामदेव महाराज सांगतात. संतश्रे÷ ज्ञानोबा माऊली म्हणतात, जैसी रसाचीच सुचट। बीजगणिका घनवट। परी तियेस्तव होय का÷।अंकुरद्वारे ।।7.55 ।। जेव्हा बी रसपूर्ण असते तेव्हा ती पेरली की अंकुर फुटून झाड निर्माण होते. त्याचे लाकूड तयार होते. हे बीज चैतन्यातून निर्माण होते. सूक्ष्मातून स्थूलात ढकलून देण्याचे कार्य करणारी शक्ती म्हणजे माया आहे. एका छोटय़ाशा बीजात विराट वृक्ष सामावलेला असतो परंतु पुन्हा त्या वटवृक्षाचे पर्यवसान बीमध्येच होते. ही शक्तीदेखील मायेमध्येच आहे. जडातून सूक्ष्मामध्ये नेणारी सुद्धा मायाच आहे. या शक्तीचा उपयोग तुम्ही करूनच घ्या, असे माऊली म्हणतात. परमात्मा अव्यक्त आहे. तो या संपूर्ण जगात भरलेला आहे. त्याच्यामधूनच हे दृश्य जगत निर्माण झाले आणि ते परत त्याच्यातच जाणार आहे. जीवाने शिवाचे वैभव आपलेसे करून घेतले की परमार्थ साधला असे पूजनीय बाबा बेलसरे सांगत असत.
निसर्ग हा अद्भुत आहे. त्याचे ध्यान करणे म्हणजे इवलेसे बीज आहे. त्यातून पिंडी ते ब्रह्मांडी असलेले सारे मनुष्य देहातच गवसते. वृक्ष आपले बीज रुजून त्याचा विस्तार कसा होईल आणि तो विस्तारतच कसा जाईल हे निसर्ग धर्मानुसार करीत असतो. काटेसावरीचे झाड याचे उदाहरण आहे. काटेसावरीचे बोंड उन्हात तापते, तडकते आणि त्यातून उडत्या म्हाताऱया वाऱयासवे दूरवर निघून जातात. काटेसावरीच्या झाडाखाली पाण्याचा साठा नसतो. झाडाखाली जर बी पडले तर ते रुजणार नाही हे झाडाला ठाऊक असते. म्हणूनच ते बी दूर दूर पाठवून देते. काही वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होऊन सफरचंदांच्या झाडांचे फार नुकसान झाले. झाडे जमीनदोस्त झाली जी तग धरून जगली त्याची फळे नेहमीसारखी लालबुंद न येता काळी-निळी निर्माण झाली. बऱयाच बागायतदारांनी ती नासकी कुजकी म्हणून फेकून दिली. परंतु एका हुशार माणसाने ती काळी सफरचंदे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली आणि काय आश्चर्य ! त्यावर संशोधन करताना असे आढळले, की नेहमी येणाऱया सफरचंदांपेक्षा या फळांमध्ये पौष्टिक गुण अतिशय जास्त प्रमाणात होते. ही काळीनिळी सफरचंदे गुणसंवर्धक होती. याचा अर्थ असा की नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना झाडाने आपली सारी शक्ती फळाला अर्पण केली आणि ते झाड मृत्युमुखी पडले. आपले बीज सशक्त राहून पुढे अनेक पिढय़ा ते टिकून राहावे म्हणून झाडाने केलेली ती धडपड होती. श्री दत्त महात्म्य या ग्रंथामध्ये परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी देहाचे गुरुत्व सांगतात पृथ्वी आधी पंचमहाभूतांचा बनलेला हा मनुष्यदेह वृक्षासारखाच उद्भवतो वाढतो आणि पुनर्जन्माला कारण ठरतो. अशी कर्मरूपी बीजे ठेवून नष्ट होतो. जन्मभर वासनांना उराशी बाळगून संकल्प करून चांगली वाईट मिश्र कर्मे करीत असतो. इंद्रिये जीवाला विषयांकडे ओढत असतात. त्यांची तृप्ती करण्यात सगळे आयुष्य संपते; पण वासना मात्र वाढतच असतात. असा हा देह पडतो तेव्हा जाळला तर भस्म होतो. पुरला तर किडय़ांचा किंवा कोल्हाकुत्र्यांचे भक्ष्य होतो आणि शेवटी त्याची वि÷ा होते. म्हणून त्याची आसक्ती धरु नका. तरीही दुःखपरंपरेतून सुटण्यासाठी मानवी देहाची आवश्यकता आहे. देवांपासून इतर सगळय़ा योनी या भोगयोनी आहेत. मोक्षप्राप्ती, आध्यात्मिक उन्नती यासाठी त्याचा उपयोग नाही. म्हणून देव सुद्धा दुर्लभ मानवदेह मिळावा ही इच्छा बाळगून असतात. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे। माथा हात ठेविला ते फुडे। बीजचि वाइले।।’ सद्गुरूंनी माझे लाड पुरवत कौतुक केले आणि मस्तकावर हात ठेवून कृपाबीज पेरले. सद्गुरू जेव्हा एखाद्या शिष्याला जवळ घेतात तेव्हा ती कृपा काही तात्पुरती नसते, तर जन्मोजन्मांची असते. शिष्याचे पूर्वसंस्कार आणि तळमळ साधना याद्वारे तो अध्यात्मवाटेवर पुढेपुढे जात असतो. सद्गुरू युगानुयुगे.. त्याच्या उद्धारापर्यंत अखंड सोबत करतात. एक दिवस ‘आपणासारखे करिती तात्काळ’ ही सद्गुरूप्रचिती शिष्याला येते आणि कळते बीमधून सुरुवात होऊन शेवटही बीमध्येच होतो. भक्तीची सुरुवात प्रेमात होते आणि अंतही प्रेमातच होतो. गुरु-शिष्य भावात फक्त प्रेमच शिल्लक राहते.
– स्नेहा शिनखेडे








