प्रतिनिधी/ बेळगाव
मागील काही दिवसांपासून भाजीपाल्यांच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाल्यांच्या दराचे चटके सहन करावे लागत आहेत. काकडी, बिन्स, दोडकी, मेथी, टोमॅटो आदी भाज्यांचे दर वाढले आहेत. आधीच महागाईने जनता होरपळून गेली आहे. त्यातच भाजीपाल्यांच्या दराने उच्चांकी गाठल्याने सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे कठीण झाले आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात ढबू 50 रु. किलो, काकडी 80 रु. किलो, दोडकी 60 रु. किलो, फ्लॉवर 30 रु. एक, कारली 40 रु. किलो, बिन्स 80 रु. किलो, ओली मिरची 40 रु. किलो, टोमॅटो 50 रु. किलो, बटाटा 30 रु. किलो, वांगी 40 रु. किलो, भेंडी 30 रु. किलो, मुळा 20 रुपयांना 5, लाल भाजी 20 रुपयांना 4 पेंडय़ा, कांदापात 20 रुपयांना 4 पेंडय़ा, मेथी 20 रुपयांना एक पेंडी, पालक 20 रुपयांना 4 पेंडय़ा, शेपू 10 रुपयांना दोन पेंडय़ा अशी विक्री सुरू आहे. मागील काही दिवसांपासून वाढलेल्या भाजीपाल्यांचे दर अद्याप स्थिर आहेत.
खाद्यतेलांच्या किमतीत किंचित घट
रशिया-युपेन युद्धापासून वाढलेल्या खाद्यतेलांच्या किमतीत किंचित घट झाली आहे. 15 किलो खाद्यतेलाच्या डब्यामागे केवळ 15 ते 20 रुपयांनी दर कमी झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांत खाद्यतेलांचे दर 200 रुपये किलो झाले आहेत. त्यामुळे फोडणी महागली आहे. खाद्यतेलाच्या किमती कमी होतील, अशी आशा ग्राहकांना होती. मात्र, 15 किलो डब्यामागे केवळ 15 रुपये दर कमी झाल्याने ग्राहकांची घोर निराशा झाली आहे.
एपीएमसी मार्केट आणि जयकिसान भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक वाढत असली तरी भाजीपाल्यांच्या दरात अद्याप घसरण झाली नाही. त्यामुळे नागरिकांना अधिक दरानेच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.









