विविध राज्यांमध्ये जाळपोळ-रास्तारोको ः दगडफेक-गोळीबाराच्याही घटना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बिहार, उत्तर प्रदेशसह विविध राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या अग्निपथ या लष्कर भरतीच्या योजनेला तीव्र विरोध होत आहे. अनेक ठिकाणी तरुणांनी हिंसक आंदोलन करत गाडय़ा जाळल्या. अग्निपथ योजनेविरोधात देशात विरोधाची धार दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बिहार-उत्तर प्रदेशमध्ये तिसऱया दिवशीही गोंधळ सुरूच आहे. जौनपूरमध्ये आंदोलकांनी रोडवेजच्या दोन बस आणि अनेक वाहनांची जाळपोळ केली. याचवेळी बिहारमध्ये गोळीबार करण्यात आला. राजस्थानमध्येही शनिवारी तरुणांनी मोठय़ा प्रमाणात निदर्शने केली.
उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये जाळपोळ
उत्तर प्रदेशमध्ये तिसऱया दिवशीही गोंधळ सुरूच आहे. जौनपूरमध्ये आंदोलकांनी रोडवेजच्या दोन बस आणि अनेक गाडय़ा जाळल्या. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. सिक्रारा आणि बदलापूर भागात प्रत्येकी एक बस पेटवण्यात आली आहे. वाराणसी-लखनौ महामार्गावर 10 हून अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. दुसरीकडे चंदौलीच्या कुचमन रेल्वेस्थानकात तरुणांनी घुसून तोडफोड केली.

बिहारमध्ये दगडफेक-गोळीबार
बिहारमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलनाचा शनिवारी चौथा दिवस आहे. पटनामधील मसौधी येथील टारगेना स्टेशनजवळ दगडफेक आणि गोळीबार झाला. आंदोलकांनी स्थानकाची तोडफोड सुरू केली. पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने पेटवून देण्यात आली. तसेच आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. याप्रसंगी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला.
राजस्थान- जयपूर-दिल्ली महामार्ग ठप्प
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध थांबण्याऐवजी वाढू लागला आहे. राजस्थानमध्ये शनिवारीही अनेक जिह्यांमध्ये तरुण मोठय़ा प्रमाणात आंदोलनात उतरले होते. यावेळी आंदोलकांची पोलिसांशी झटापटही झाली. सर्व जिह्यांमध्ये निदर्शने होण्याची भीती लक्षात घेता सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. सोशल मीडियावरही प्रशासन लक्ष ठेवून आहे. राज्यातील जयपूर, जोधपूर, अजमेर अलवरसह सहा जिह्यांमध्ये हिंसक निदर्शने करण्यात आली.
पंजाब-गुजरातमध्येही तोडफोड
अग्निपथ योजनेचा विरोध आता पंजाबमध्येही पोहोचला आहे. लुधियानात शनिवारी तरुणांनी रेल्वेस्टेशनची तोडफोड केली. काठय़ा, लोखंडी रॉड घेऊन तरुण आले. त्यांनी प्रथम स्थानकाच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली आणि नंतर आत येऊन स्टॉल्स आणि सरकारी कार्यालयांची तोडफोड केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत 4 तरुणांना अटक केली. पंतप्रधान मोदींचे गृहराज्य गुजरातमध्येही अग्निपथ योजनेला विरोध होत आहे. जामनगरमध्ये सकाळी हजारो आंदोलकांनी एकत्र येत घोषणाबाजी सुरू केली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱयांचा वापर केला.
केसीआर सरकारकडून मृतांच्या वारसांना 25 लाख
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शुक्रवारी अग्निपथच्या निषेधार्थ मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या वारसांना 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अग्निपथच्या विरोधात धरणे आंदोलनात युवक सहभागी झाला होता. यादरम्यान रेल्वे पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
12 रेल्वेगाडय़ांची जाळपोळ
रेल्वेने जारी केलेल्या निवेदनानुसार, बुधवारी आंदोलन सुरू झाल्यापासून 12 रेल्वेगाडय़ा जाळण्यात आल्या आहेत. तसेच या कालावधीत 300 हून अधिक गाडय़ा प्रभावित झाल्या आहेत. 214 गाडय़ा रद्द करण्यात आल्या असून 11 अन्य मार्गांवरून वळवण्यात आल्या आहेत. 90 रेल्वेगाडय़ा आपल्या अंतिम थांब्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. याचदरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे संपत्तीचे नुकसान न करण्याचे आवाहन केले आहे.









