प्रतिनिधी /मडगाव
गोवा डेअरीच्या संचालक मंडळाची निवड करण्यासाठी रविवार दि. 19 रोजी निवडणूक होत असून आपलेच पॅनल निवडून यावे यासाठी एका पॅनलकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याची माहिती हाती आली आहे. या निवडणुकीत एकूण तीन पॅनल उतरली आहेत.
हाती आलेल्या माहिती नुसार गोव्याच्या एका शिखर बँकेच्या शाखा व्यवस्थापकांकडून गोवा डेअरीला दूध पुरवठा करणाऱया संस्थांच्या चेअरमनावर दबाव टाकला जात आहे. आपलेच पॅनल निवडून यावे यासाठी तिन्ही पॅनेलमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. सुरवातीला भाजप पुरस्कृत पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, भाजपने आपले अधिकृत पॅनल निवडणुकीत उतरविलेले नाही.
ही निवडणूक निपक्षपातीपणे व्हावी अशी इच्छा दूध पुरवठा करणाऱया संस्थांच्या चेअरमनकडून व्यक्त होत आहे. मात्र, ज्या पद्धतीने सद्या दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी स्वता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, काही जणांनी सहकार्य केले नसल्याने ही निवडणूक घेणे क्रमप्राप्त ठरले आहे.
दोन-तीन लीटर दूध पुरवठा करणारे रिंगणात गोवा डेअरीच्या एका पॅनलमध्ये किमान चार ते पाच उमेदवार हे दिवसाला केवळ दोन ते तीन लीटर दूध पुरवठा करतात ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुळात ते दूध व्यवसायाशी निगडीत आहेत का असा सवाल ही उपस्थित होत आहे. तर एका पॅनलमध्ये गोवा डेअरीला दिवसाकाठी 80 ते 100 लीटर पर्यंत दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक शेतकऱयांचा समावेश आहे.









