आरोग्यासाठी व्यायाम, योग, प्राणायाम, योग्य आहार-विहार खूप गरजेचा आहे. पण त्यासाठी योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे. आरोग्याबद्दल एका बाजूला जागरूकता होत आहे असे चित्र असले तरी योग्य व तज्ञ मार्गदर्शनाची गरज आहे. के.के सारख्या गायकाला कार्यक्रमात हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. पण योग्य व तज्ञ मार्गदर्शनाअभावी तातडीच्या उपचारांची ऐवजी पळापळ आणि धावपळ खूप झाली. परिणामी त्याच्या वाट्याला मृत्यू आला. के.के प्रसिद्ध व्यक्तिमत्व त्यामुळे त्यावर चर्चा तरी झाली. पण असे अनेक मृत्यू रोज होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील नामवंत योग शिक्षक, साहसी क्रीडा मार्गदर्शक, शरीरसौष्ठव पटू व हृदय उपचार तज्ञांनी गुरुवारी चर्चा केली. योग्य आहार विहारा बरोबरच व्यायाम योगा साठी तज्ञ मार्गदर्शकाची आवश्यकता व्यक्त केली.
रोज 45 -मिनिटे किंवा आठवड्यात एकशे पन्नास मिनिटे व्यायाम गरजेचा
प्रख्यात गायक के.के चा मृत्यू ही खूप वाईट घटना. पण ही घटना इतरांना खूप काही सांगून गेली आहे. इतक्या मोठय़ा हॉलमध्ये, इतक्या लोकांच्या समोर हृदयविकाराचा झटका आला. पण त्याच्यावर त्याच ठिकाणी कोणतेही तातडीचे उपचार झाले नाहीत किंवा त्याला तातडीने दवाखान्यात नेले गेले नाही. परिणामी त्याच्या वाट्याला मृत्यू आला. त्यामुळे प्रथमोपचाराचे ज्ञान सर्व स्तरावर आवश्यक आहे. आपल्याकडे आरोग्याबद्दल जागरुकता काही प्रमाणात झाली आहे. पण योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे. लोक व्यायाम करत नाहीत तर, ते कोणाचे तरी अनुकरण करतात. आपल्या शरीराला काय व्यायाम आवश्यक आहे ? तो कसा करायचा? -आहार काय घ्यायचा? याची माहिती त्यांना दिली जात नाही.
वास्तविक रोज 45 -मिनिटे किंवा आठवडय़ात एकशे पन्नास मिनिटे व्यायाम केला तरी तो शरीराला पुरेसा आहे. पण हा चार तास व्यायाम करतो म्हणून तोही चार तास व्यायाम करतो हे चूक आहे. याशिवाय झटपट परिणाम म्हणून स्टेरॉईड्चा वापर चालू आहे. तो जर मार्गदर्शनाशिवाय असेल तर तो नक्कीच जीवघेणा आहे. काही सप्लीमेंटमध्ये 80 टक्के स्टेरॉईड आहे. त्याचा शरीराला तोटाच आहे. क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केल्यास हृदयावरचा भार आणखी वाढतो. त्यामुळे योग्य व्यायाम आहार विहार या बरोबरच योग प्राणायामाची आवश्यकता आहे. पण त्यासाठी योग्य मार्गदर्शक गरजेचा आहे. आणि रोज सात तास सलग झोप हवीच. ज्याला पूर्वी को व्हीड होऊन गेला आहे. त्याने तर पुन्हा व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपली इको व ट्रेडमिल टेस्ट करून घेणे अत्यावश्यक आहे.
ज्येष्ठ हृदय विकार तज्ञ, डॉ. अक्षय बाफना.
व्यायामासोबत आहारही अत्यंत महत्वाचा
प्रत्येक खेळाडूने त्याच्या खेळाच्या प्रकारानुसार व्यायाम करणे गरजेचे आहे. मात्र खेळाडू घडण्यासाठी त्याच्या पालकांनीही तितकीच मेहनत घेणे आवश्यक आहे. त्यांनी आपल्या मुलाला देशासाठी जगायला शिकवणे तितकेच महत्वाचे आहे. लहानपणापासूनच त्याला पोहणे आणि योगा शिकवणे गरजेचे आहे. त्याच्या खेळाच्या गरजेनुसार प्रत्येक खेळाडूचा स्टॅमिना वाढवणे आवश्यक आहे. यानुसारच त्याची तयारी करुन घेतली जाते. कोविडनंतर आरोग्याची काळजी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. काही लोक स्वतःहून चुकीच्या पद्धतीने व्यायाम करतात. यातून अपघात घडतात आणि काही वेळा लोकांवर कायमचे अधू होण्याची वेळ येते. हे टाळण्यासाठी तंत्रशुद्ध मागदर्शकांकडूनच व्यायाम करुन घेणे गरजेचे आहे. व्यायामासोबतच आहारही अत्यंत महत्वाचा आहे. असे मत आश्विन भोसले यांनी व्यक्त केले.
क्रिडा प्रशिक्षक,आश्विन भोसले.
मानसिक संतुलन ठेवण्याचे काम प्राणायम करते
सध्या प्राणायम करण्याच्या बाबतीत अनेक नागरीकांच्या मनात चुकीचे समज आहेत. हे दूर करण्यासाठी योग शिक्षकांची गरज आहे. लोकांनी टिव्हीवर, किंवा इंटरनेटच्या माध्यमातून प्राणायम करणे चुकीचे आहे. शाररिक कितीही सुदृढ असले तरी मन सदृढ असणे गरजेचे आहे. आणि मन शांत ठेवण्याचे काम प्राणायम करते. मनातील नकारात्मक विचार दुर करुन मानसिक संतुलन ठेवण्याचे काम प्राणायम करत असते. सध्या नैराश्य येणे, आत्महत्या करणे, भिती वाटणे अशा घटना वाढल्या आहेत. याला दुर करणचे काम प्राणायम करत असते. योगा केल्याने शरीरातील उर्जा वाढते त्यामुळे उर्जा एकत्रित होवून एखादे काम जोमाने किंवा ताकदीने करण्याची उमेद वाढते. सायन्स आज कितीही पुढे गेले असले तरी योगा खूप महत्वाचे आहे. यासोबत योगाची आवड असणेही तितकेच गरजेचे आहे.
योग प्रशिक्षक,अरुण बेळगांवकर
आठवड्यात वजन कमी करताय सावधान…
सध्या सगळीकडे आठ दिवसांत वजन कमी करण्याच्या जाहिरात दिसत आहेत. मात्र हे साफ चुकीचे आहे. शास्त्रशुद्ध किंवा वैज्ञानिक पद्धतीने वजन कमी करत असताना ते 3 महिन्यामध्ये 5 ते 6 किलो पर्यंतच वजन कमी करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने जर आपण वजन कमी करत असू तर ते बरोबर आहे. मात्र यापेक्षा वेगळ्या पद्धतीने वजन कमी करणे म्हणजे एक प्रकारचा आजार आहे.
जिमबाबत सरकारने नियम करणे आवश्यक
सध्या गल्लीबोळामध्ये जीम सुरु आहेत. मात्र अशा ठिकाणी तंत्रशुद्ध शिक्षण मिळते की नाही हे पाहणे गरजेचे आहे. यामुळे जसे रुग्णालय, लॅबोरेटरी किंवा अन्य बाबतीत सरकारने काही नियम केले आहेत. तसेच जिमबाबतही काही नियम करणे गरजेचे आहे. त्याचसोबत जिममधील ट्रेनरचे ट्रेनिंग घेणेही आवश्यक आहे. जिममध्ये एक छोटे शॉक मशिनही आवश्यक आहे.
सप्लीमेंटवर बंदी आवश्यक
झटपट बॉडी करण्याच्या किंवा तीन महिन्यात सिक्स पॅक्सच्या मागे लागून तरुणाई सप्लीमेंटच्या आहारी जात आहे. मात्र हे सप्लीमेंट शरिराला घातक असतात. काही जिममध्येही प्रोटीनच्या नावाखाली सप्लीमेंटची विक्री केली जाते. शासनाने तातडीने हे बंद करणे आवश्यक आहे. सप्लीमेंट घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम भयानक दिसत आहेत. सध्या ऍनाबुलक्स नावाचे स्टेरॉईड प्रोटीनच्या नावाखाली घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
व्यायाम, योगा बाबत तज्ञांचे मत
-सिक्स पॅकच्या मागे लागू नका
-रोज केवळ 40 ते 45 मिनीटेच व्यायाम करा
-व्यायामानंतर स्ट्रेचिंग (बॉडी कुल) करणे आवश्यक
-जिममधील ट्रेनर कडून व्यायाम, व डाएट प्लॅन बनवून घ्या
-जिमसोबतच योगा आवश्यक
-रोज 7 तास गाढ व शांत झोप आवश्यक
-निर्व्यसनी राहणे गरजेचे
-व्यायाम करताना दुसऱ्याचे अनुकरण नको
-जिम लावताना तेथील साहित्य,प्रशिक्षकांची माहिती घ्यावी
-योग्य आहाराकडे लक्ष देण्याबरोबर आहाराच्या वेळा पाळाव्यात
-स्टेरॉईडस घेताना डॉक्टरांचा सल्ला व तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
मृत्युचे प्रमाण व टककेवारी….
एका जागतिक निष्कर्षानुसार नेहमीच व्यायाम करणाऱ्यांचे मृत्यूचे प्रमाण अवघे दोन टक्के आहे.मात्र ज्यांनी आजपर्यंत काहीच व्यायाम केलेला नाही व पुढेही करण्याची शक्यता नाही त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण 35 टक्के आहे. व्यायाम करत होते व आता व्यायाम बंद केला आहे यांच्यात मृत्यूचे प्रमाण 52 टक्के आहे. जे आजपर्यंत व्यायाम करत नव्हते व आजपासून ज्यांनी व्यायाम सुरू केला आहे त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण 15 टक्के राहते. आणि जे नियमीत व्यायाम करतात त्यांच्यात मृत्युचे प्रमाण दोन टक्के आहे. असे डॉ. बाफना यांनी यावेळी सांगितले.
Previous Articleमालवण शहरामध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी
Next Article वकिलांच्या साखळी आंदोलनाला सुरुवात
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.