सर्व क्षेत्रात डिचोली मतदारसंघाला विकासाच्या प्रवाहात आणणार. बेरोजगारी हटविण्यास प्रथम प्राधान्य. विविध प्रकल्पांना मार्गी लावण्यावर भर.
रविराज च्यारी / डिचोली
सदैव राजकीय आकसापोटी विकासाच्या बाबतीत मागे राहिलेल्या डिचोली मतदारसंघवरील विकासाच्या बाबतीत मागास हा ठपका पुसून काढताना या मतदारसंघाला सर्व क्षेत्रात विकासाच्या प्रमुख प्रवाहात आणण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र झटणार. येणाऱया पाच वर्षांमध्ये या मतदारसंघातील प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावेल असा विकास साधून डिचोली मतदारसंघ एक विकसनशील व आदर्श मतदारसंघ बनविणार, अशी भावना डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े यांनी दै. तरूण भारतशी बोलताना व्यक्त केले.
डिचोली मतदारसंघातील जनतेने गेली अनेक वर्षे केवळ विकासाच्या वल्गनाच ऐकल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात विकास अनुभवलेला नाही. राज्यातील इतर शहर, मतदारसंघांची स्थिती आणि डिचोली मतदारसंघाची स्थिती पाहिल्यास आज गोवा मुक्तीच्या 60 वर्षांनंतरही हा मतदारसंघ किती मागास राहिला आहे, याचा अंदाज येतो. त्यासाठी आपल्याला कोणत्याही मागील राजकारण्यांना दोष द्यायचा नाही. परंतु डिचोली मतदारसंघाच्या विकासात सदैव नकारात्मक राजकारण आडवे आल्याचे मात्र अनेकदा ऐकले आहे. याच नकारात्मक राजकारणावर मात करून सर्वांना एकत्रित घेऊन आपणास डिचोली मतदारसंघाचा विकास साधायचा आहे.
आता निवडणुका संपन्न होऊन निकालही झाला. हार जीत हा वेगळा विषय आहे. परंतु निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या सर्वांचा उद्देश हा केवळ विकासच होता. त्यामुळे यापुढे या मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित रहावे व सकारात्मक सहकार्य करावे अशी आपली इच्छा आहे. निवडणुका संपल्या आणि राजकारणही आता संपले आहे. आता आपला आणि विरोधक असा भेदभाव न करता या मतदारसंघात सर्वांनी संघटीत होऊन विकासाची गंगा कशी आणता येईल यावर जास्त प्रकाश घालणे महत्वाचे ठरेल.
निवडणुकीचा निकाल होऊन तीन महिने झाले. निवडणुकीपूर्वी आम्ही प्रचारासाठी फिरत असताना लोकांच्या समस्या आमच्यासमोर मांडल्या जात होत्या. आज निवडून आल्यानंतर या सर्व समस्या लोकांच्या राहिल्या नसून त्या आता आमदार या नात्याने आपल्या झालेल्या आहेत. आणि त्या सोडविण्यासाठी आपल शंभर टक्के प्राधान्य देणार. मतदारसंघातील कामांना सदैव प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले जाईल.
या मतदारसंघात सर्वात मोठा विषय आणि समस्या आहे ती बेरोजगारीची. सुशिक्षित तरूणांना नोकरी मिळवून देताना मतदारसंघातील युवा युवती जर स्वावलंबी बनण्यासाठी पुढे येत असल्यास त्यांना सरकारच्या असलेल्या सर्व योजना मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न असणार. मतदारसंघातील बेरोजगारांकडून त्यांची माहिती देण्याचे आवाहन आम्ही केले आहे. त्यासाठी काही खासगी कंपन्यांशी बोलून काहीजणांना रोजगार प्राप्त करून दिलेला आहे. सरकारी नोकऱया सर्वांनाच माळणे शक्मय नसल्याने अधिकाधिक युवांना खासगी अस्थापनांमध्ये समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.
या मतदारसंघात येणाऱया लाटंबार्से या औद्योगिक वसाहतीचे काम जोरदारपणे सुरू आहे. या औद्योगिक वसाहतीत भुखंड तयार करण्यात आलेले आहेत. सदर औद्योगिक वसाहतीमध्ये सर्वप्रथम वीज व पाणी पुरवठा व्हावा यासाठी आपला पाठपुरावा जोरदारपणे चालू आहे. या दोन्ही सोयी या औद्योगिक वसाहतीत दाखल झाल्यानंतर लगेच तेथे औद्योगिक प्रकल्प येण्यास सुरूवात होणार आहे. यामुळे डिचोली मतदारसंघातील बेरोजगारीचा मोठा प्रश्न मिटण्यास मदत होईल. हि औद्योगिक वसाहत लवकरात लवकर कार्यान्वति करण्याचे ध्येय आपण डोळय़ासमोर ठेवले आहे.
मतदारसंघात रस्त्याचे जाळे निर्माण करताना ज्याठिकाणी रस्ते झालेले नाही, त्याठिकाणी रस्ते साकारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. फणसवाडी, लाटंबार्से, सोनारभाट येथे रस्ते झालेले नाहीत. ते करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अडवलपाल गावातील धनगरवाडा येथे जाणारा रस्ता व लहान पुल झालेला आहे. त्याला जोडूनच लाटंबार्से औद्योगिक वसाहतीपर्यंत पोहोचणारा रस्ता येणाऱया काळात साकारला जाणार आहे. तसेच निवडून आल्यानंतर मुळगावच्या तांबडय़ा रस्त्याचे काम विक्रमी काळात पूर्ण करून लोकांना सोय करून दिली. मतदारसंघातील अनेक रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करून लोकांना पावसाळय़ापूर्वी रस्ये सुरक्षित करून देण्यात आले आहेत. तर पावसाळय़ानंतर उर्वरित सर्व रस्त्यांची डागडुजी व हॉटमिक्स डांबरीकरण केले जाणार आहे.
मतदारसंघातील वीज समस्येकडे आपण गांभिर्याने लक्ष घातले आहे. साळ येथील वीज उपकेंद्र कार्यान्वति झाल्यानंतर विशेषतः ग्रामीण भागातील वीज समस्येचा विषय निकालात येण्यास मदत होणार आहे. तसेच या वीज उपकेंद्रातून लाटंबार्से औद्योगिक वसाहतीला वीजपुरवठा देण्यास सोयीस्कर ठरणार आहे. अनेक रस्त्यांवर पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळी लोकांना त्रास होतो. त्यावर उपाययोजना करताना लवकरच आवश्यक त्रा सर्व रस्त्यांच्या बाजूला नवीन खांब व दिवाबत्तीची सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. डिचोली मतदारसंघात असलेल्या तिळारी कालव्यांच्या सर्विस रस्त्यांवर अंधार असल्याने त्यांचा सर्रास दुरूपयोग होतो. हा दुरूपयोग टाळण्यासाठी या कालव्यांच्या रस्त्यांवर सुध्दा पथदीप घालण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. लोकांना घराघरात वीजेची जास्त प्रमाणात समस्या होऊ नये यासाठी काळजी घेतली जाणार आहे.
पिण्याच्या पाण्याचा विषयही गांभीर्याने हाती घेण्यात आलेला आहे. डिचोली मतदारसंघाला जास्तीत जास्त पाणी पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पातून येते. तर काही भागांना अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातून येते. काही डोंगराळ भागात असलेल्या घरांना पाण्याची मोठी समस्या होते. हि समस्या दूर करून डिचोली मतदारसंघाची दरदिवसाची तहान भागविण्यासाठी धुमासे गावाच्या डोक्मयावर एक स्वतंत्र जलशुद्धीकरण प्रकल्पाला मंजूरी मिळाली आहे. सदर प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच आहे. कारण या जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याचा लाटंबार्से औद्योगिक वसाहतीला लाभ होणार आहे. त्यासाठी हा प्रकल्प लवकर प्रत्यक्षात आणणे आवश्यक आहे. आपण सरकारदरबारी या प्रकल्पाचा विषय लावून धरणार.
डिचोली शहरात सध्या विकासकामांना जोर देण्यात आलेला आहे. बसस्थानकाचे रखडलेले काम मार्गी लावण्यात आलेले आहे. आज जूना संपूर्ण बसस्थानक जमिनदोस्त करून नव्याने बसस्थानक इमारत उभारण्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे. सरकारी प्राथमिक केंद्र शाळेचे काम अंतिम टप्प्यात असून या चालू महिन्यात सदर काम पूर्णत्वास येणार आहे. राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने या शाळेचे काम आता पूर्ण केल्यास लगेच या शाळेचा उदघाटन सोहळा होणार आहे. त्यामुळे जुन्या पोलीस स्थानकाची इमारत खाली होणार. त्यानंतर ती इमारत पूर्णपणे हटवून त्याठिकाणी सर्व शासकीय कार्यालये असलेली प्रशासकीय बहुद्देशीय इमारत आकार घेणार आहे. याही प्रकल्पाची आपण संपूर्ण माहिती मिळवलेली असून तोही प्रकल्प लकवरच सुरू करण्याचा मानस आहे. डिचोली अग्निशामक दलाच्या इमारतीचे काम सध्या रखडून पडलेले आहे. ते पुन्हा सुरू करण्यासाठी आपण सरकारदरबारी प्रयत्न करणार आहे. डिचोली शहराचा कायापालट करताना हे शहर आधुनिक पद्धतीने सजविले जाणार आहे.
डिचोली शहरातील सेतूसंगम ते मुस्लीमवाडा या रस्त्याचे दुतर्फा सुशोभीकरण हाती घेतले जाणार आहे. डिचोलीत सर्व प्रकारचे कलाकार आहेत. या कलाकारांना सन्मान देण्यासाठी एक कलाभवन किंवा सांस्कृतिक भवन साकारण्यासाठी प्रयत्न आहे. त्यासाठी उपयुक्त अशी जागा मिळाल्यास हा प्रकल्प लवकर मार्गी लावला जाणार आहे. क्रिडापटूंसाठी इनडोअर स्टेडियम, स्विमिंग पुल यासारखे प्रकल्प आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. हाऊसिंग बोर्ड भागात फुटसाल तयार करून खेळाडूंच्या प्रतिभेला वाव मिळवून देण्याचे स्वप्न बाळगले आहे.
सर्व पंचायतींमध्ये सुसज्ज क्रिडा मैदाने उभारली जाणार आहे. त्यासाठी हल्लीच क्रिडामंत्री गोविंद गावडे यांनी डिचोली मतदारसंघाच्या भेटीत सर्व गोष्टींची माहिती करून घेतली आहे. सध्या तयार.असलेल्या जागांवर क्रिडा मैदाने उभारण्यासाठी हालचाली सुरू करण्यात येणार आहे. डिचोली मतदारसंघ हा सांस्कृतिक ठेव असलेला मतदारसंघ असल्याने या मतदारसंघातील विविध ऐतिहासिक ठेव या मतदारसंघाच्या पर्यटनदृष्टय़ा विकासाला खुणावतो. त्याअनुषंगाने डिचोली मतदारसंघातील विविध आकर्षक ठिकाणांचा पर्यटनदृष्टय़ा विकास साधण्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. डिचोली शहरात असलेल्या विविध पर्यटन स्थळांचा योग्य विकास साधताना या सर्व ठिकाणी पर्यटकांनी भेटी दिल्यानंतर एक रात्र डिचोलीत वास्तव्य करावे यासाठी एक चांगले पंचतारांकित हॉटेल साकारण्याचा विचार आहे. जेणेकरून या मतदारसंघातील, शहरातील लहान मोठय़ा व्यवसायिकांना व्यवसाय मिळणार आणि डिचोलीची किर्ती सर्वत्र होणार.
हे सर्व करताना ग्रामीण भागातील तसेच दुर्बल घटकांना सरकारी सर्व योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी आवश्यक असलेली सर्वती मदत करणे हे उपक्रमही हाती घेतले जाणार आहेत. आमच्या शिक्षा व्हिजन या संस्थेतर्फे दरवषी शिक्षणात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रोत्साहन देतोच. शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये व शिक्षण ग्रहण करण्याचा हक्क प्रत्येक मुलांला मिळावा यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार. डिचोली मतदारसंघ विकसित, सुव्यवस्थित करतानाच शंभर टक्के साक्षर व्हावा यासाठी आपण योगदान देणार. असे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े यांनी सांगितले.









