प्रतिनिधी/वास्को
वास्कोतील अग्नीशामक दलाचे कदंब स्थानकाजवळील केंद्राचे दाबोळीत स्थलांतर करण्यात आले आहे. दाबोळीत उभारण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या इमारतीत अग्नीशामक दलाची सोय करण्यात आलेली असून मंत्री माविन गुदिन्हो यांनी या इमारतीतील जागेचा ताबा मंगळवारी दुपारी अग्नीशामक दलाकडे दिला.
वास्कोतील शासकीय अग्नीशामक दलाची जुनी इमारत पाडून चार वर्षे उलटली आहेत. त्या जागी नवीन इमारत उभारण्याचे काम लांबणीवर पडले होते. मात्र, काही माहिन्यांपूर्वी नव्या इमारतीचा पाया घालण्याच्या कामाला सुरवात झालेली आहे. परंतु अग्नीशामक दलाच्या तात्पुरत्या सोयीसाठी इमारत उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे गेली चार वर्षे वास्कोतील अग्नीशामक दल त्याच ठिकाणी अडचणीतच आपला कार्यभार हाकत आलेले आहे. अग्नीशामक दलाचे स्थलांतर होत नसल्याने नवीन इमारत उभारणीच्या कामातही अडचणी येत होत्या. शिवाय अग्नीशामक दलाची फारच अडचण झाली होती. दलाचे स्थलांतर करण्यासाठी काही जागांची चाचपणी करण्यात आली होती. अखेर दाबोळीतील नौदल डेपोजवळ सरकारने उभारलेल्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या इमारतीत अग्नीशामक दलाची सोय करण्यात यश आले आहे.
दाबोळीचे आमदार तसेच वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी या इमारतीतील जागेचा ताबा आग्नीशामक दलाकडे दिला. यावेळी वास्कोचे आमदार दाजी साळकर, जिल्हा पंचायत सदस्या ऍड. अनिता थोरात, मुरगावचे उपजिल्हाधिकारी रवीशेखर निपाणीकर, अग्नीशामक दलाचे वास्कोतील प्रमुख फ्रांसिस्को मेंडिस, मुरगावचे नगरसेवक तसेच भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. वास्कोतील कदंब स्थानकाजवळील अग्नीशामक दलाची नवीन इमारत सुसज्ज होईपर्यंत दलाचे केंद्र दाबोळीतच राहणार आहे.









