मात्र, ममता बॅनर्जींच्या बैठकीला 5 प्रमुख पक्ष अनुपस्थित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जुलै महिन्यात होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उतरविण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने येथे विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला 17 विरोधी पक्ष उपस्थित होते. तथापि, पाच महत्वपूर्ण विरोधी पक्षांची अनुपस्थिती असल्याने सर्वंकष विरोधी ऐक्याला हुलकावणी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या बैठकीला काँगेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँगेस, राष्ट्रीय जनता दल, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सीपीआयएमएल, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, निधर्मी जनता दल, आरएसपी, मुस्लीम लीग, राष्ट्रीय लोकदल आणि झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिरोमणी अकाली दल, आम आदमी पक्ष, तेलंगणा राष्ट्र समिती, बिजू जनता दल आणि वायएसआर काँगेस हे पाच पक्ष अनुपस्थित होते. यापैकी वायएसआर काँगेस आणि बिजू जनता दल हे या निवडणुकीसाठी निर्णायक ठरु शकतात.
रालोआची बाजू अधिकच बळकट
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संयुक्त उमेदवार देण्याचा निर्णय या बैठकीत झाला असला तरी, वायएसआर काँगेस आणि बिजू जनता दल, तसेच तेलंगणा राष्ट्र समिती यांचा समावेश नसल्याने उलट रालोआची बाजू भक्कम झाली आहे. कारण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी रालोआच्या बाजूने सध्या 40 टक्क्यांहून अधिक मते आहेत. या तीन पक्षांपैकी कोणताही एक पक्ष रालोआच्या बाजूने उभा राहिल्यास त्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
एमआयएमला आमंत्रण नाही
एमआयएम या पक्षाला या बैठकीचे आमंत्रण नव्हते. आमंत्रण असते तरी आमच्या पक्षाचा प्रतिनिधी उपस्थित राहिला नसता, अशी माहिती या पक्षाचे नेते असदुद्दिन ओवैसी यांनी दिली. या बैठकीला सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही बोलाविण्यात आले होते. तथापि, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा आदी राज्यांचे मुख्यमंत्री दूर राहिले, अशी माहिती देण्यात आली आहे.
पवारांना गळ
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवावी, असा आग्रह विरोधी पक्षांकडून केला गेला होता. मंगळवारी बॅनर्जी यांनी पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली होती. तथापि, त्यांनी ती नाकारली असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
काँगेसशिवाय यश शक्य नाही
या निवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार विजयी व्हायचा असल्यास काँगेसला टाळता येणे शक्य नाही, असे प्रतिपादन या पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. या बैठकीला जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला हे काँगेस नेतेही उपस्थित होते. विरोधी मतांपैकी जवळपास 50 टक्के मते काँगेसकडे आहेत.
नामांकन प्रक्रियेचा प्रारंभ
राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै या दिवशी होणार आहे. या निवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेचा प्रारंभ बुधवारपासून झाला. 29 जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. 30 जूनला छाननी केली जाईल तर 2 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 21 जुलैला (गुरुवारी) मतगणना होऊन परिणाम घोषित केला जाईल.
बैठकीला मान्यवर नेत्यांची उपस्थिती
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल, निजदचे एच. डी. देवेगौडा आणि कुमारस्वामी, सपचे अखिलेश यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला आदी नेते या बैठकीला उपस्थित होते असे स्पष्ट करण्यात आले. या नेत्यांनी त्यांची मते आणि सूचना व्यक्त केल्या.
कोणती नावे चर्चेत
विरोधी पक्षांच्या वतीने राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून सध्या दोन नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. महात्मा गांधींचे नातू गोपालकृष्ण गांधी यांचे नाव अग्रेसर आहे. त्याखालोखाल फारुख अब्दुल्ला यांचे नाव घेतले जात आहे. गुलाम नबी आझाद यांनाही संधी मिळू शकते, अशी चर्चा विरोधी पक्षांमध्ये आहे.









