कधीच न उघडण्याचा लिखित इशारा
भीतीदर्शक चित्रपटांमध्ये तुम्ही एखाद्या मकबऱयावर लिहिलेला इशारावजा संदेश पाहिला असेल. असाच इशारा आता इस्रायलमध्ये पुरातत्वतज्ञांना एका प्राचीन ‘शापित’ मकबऱयावर मिळाला आहे. या मकबऱयावर रक्ताप्रमाणे लाल अक्षरांमध्ये तो कधीच न उघडण्याचा इशारा देण्यात आला आहे. हा मकबरा बेइत शे अरीम भागात असलेल्या एका कब्रस्तानात आढळून आला आहे. युनेस्कोच्या या जागतिक वारसास्थळी मागील 65 वर्षांमध्ये हा पहिलाच मकबरा मिळाला आहे.
या ठिकाणी मागील एक वर्षापासून उत्खननाचे काम सुरू आहे. परंतु पुरातत्वतज्ञांसाठी हा पहिला मोठा शोध आहे. हा मकबरा 1800 वर्षे जुना आहे. या मकबऱयावर मोठमोठय़ा लाल रंगातील अक्षरांमध्ये तो उघडणाऱयांसाठी गंभीर इशारा लिहिण्यात आला आहे. ‘जो कुणी ही कब्र खुली करेल, त्याला शाप देण्याचा प्रण याकोव हगेर घेत आहेत. याचमुळे ही कब्र कुणीच उघडू नये’ असे या संदेशात म्हटले गेले आहे.

हा इशारा प्रामुख्याने कब्र चोरून नेणाऱया चोरांसाठी असल्याचे मानले जात आहे. मकबऱयाचा पुन्हा वापर करण्यापासून रोखण्याच्या उद्देशाने देखील हा इशारा दिला गेला असू शकतो. मकबऱयाचा काळासोबत पुन्हा वापर केला जात होता. लिहिण्याची ही पद्धत रोमन काळानंतर किंवा बयजंटाइन काळाच्या प्रारंभिक दिवसांची आहे. याच काळात ख्रिश्चन धर्म मजबूत झाला होता. येथे सापडलेले पुरावे पाहता त्या काळात देखली लोक ज्यूधर्मीयांसोबत संबंध प्रस्थापित करू पाहत होते असे स्पष्ट होते. सध्या ही गुहा बंद करून ती काही काळासाठी सुरक्षित ठेवणार आहोत असे उद्गार संशोधक अदी इरलिच यांनी काढले आहेत.









