विषारी सापांनी एका व्यक्तीला 200 हून अधिकवेळा दंश केला तरीही तो सुखरुप आहे. विशेष बाब म्हणजे हा व्यक्ती जाणूनबुजून या सापांकडून दंश करवून घेतो, जेणेकरून फर्स्ट युनिव्हर्सल अँटे-वेनम (असे औषध ज्यामुळे शरारीतील सर्पविषाचा प्रभाव संपविता येईल) तयार करता येईल.
या व्यक्तीचे नाव टिम फ्रीडे असून तो 53 वर्षीय आहे. अमेरिकेच्या विस्कॉन्सिन येथे राहणाऱया टिमने घरात अनेक प्रकारचे साप पाळले आहेत. सर्वसाधारणपणे एक सापाने दंश केल्यास टिमवर कुठलाच प्रभाव पडत नव्हता. परंतु 2011 मध्ये दोन विषारी सापांनी दंश केल्यावर टिम मृत्यूच्या दारात पोहोचला होता.
एका तासात दोन कोब्रा सापांनी एकामागोमाग एक असा दंश केला होता. मी जवळपास मृतप्राय झालो होतो. माझ्या शरीरातील इम्युनिटी एका सापाचा दंश झेलू शकते. परंतु दोन सापांचा दंश झेलू शकत नाही. सापांच्या हल्ल्यानंतर मला रुग्णालयात हलविण्यात आले हेते. तेथे 4 दिवसांपर्यंत कोमामध्ये होतो असे टिम यांनी सांगितले आहे.

शुद्धीत आल्यावर टिमने सापांसोबतच काम करण्याचा निर्णय घेतला. आता ते कॅलिफोर्नियाच्या व्हॅक्सिनेशन रिसर्च कंपनी सेंटीव्हीक्सचे डायरेक्टर ऑफ हरपेटोलॉजीचे प्रमुख आहे. संशोधनादरम्यान टिमने स्वतःला विषारी सापांद्वारे 200 हून अधिकवेळा दंश करविला आहे. कुठल्याही सापाच्या दंशावर उपचार करता येईल अशाप्रकारचे एक युनिव्हर्सल अँटी-वेनम तयार करण्याची त्यांची इच्छा आहे.
सर्पदंश झाल्यावर प्रचंड वेदना होता. एकाचवेळी 100 मधमाशांनी डंख मारल्यासारखे वाटू लागते असे टिम यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार वर्षाला 54 लाख लोकांना सर्पदंशाला तोंड द्यावे लागते. यातील 81,000 ते 1,38,000 पर्यंत लोकांचा मृत्यू होतो.
2000-19 दरम्यान भारतात 12 लाख लोकांचा मृत्यू सर्पदंशामुळे झाला होता. म्हणजेच दरवर्षी सरासरी 58 हजार लोकांचा मृत्यू झाला. यातील एक चतुर्थांश जणांचे वय 15 वर्षांपेक्षा कमी होते. याच आकडेवारीमुळे आमचे काम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे टिम यांचे म्हणणे आहे.









