कचराकुंडांच्या ठिकाणी बसविले पेव्हर्स-राष्ट्रपुरुषांचे बॅनर्स : बसण्यासाठी बाकडय़ांची व्यवस्था : जनतेतून समाधान व्यक्त

वार्ताहर /हिंडलगा
हिंडलगा परिसरात वाढलेली कचऱयाची समस्या दूर करून संपूर्ण गावाला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी ग्रा. पं. ने अनोखी शक्कल लढविली. कचराकुंड असलेल्या ठिकाणी साफसफाई करून पेव्हर्स बसविले जात आहेत. शिवाय त्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाकडय़ांची सोय करण्यासह ठिकठिकाणी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या अस्वच्छता पसरवणाऱयांना चाप बसला असून ग्राम पंचायतीच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून हिंडलगा ग्रा. पं. कार्यक्षेत्रात लोकवस्ती मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. हिंडलगा मुख्य गावासह कलमेश्वरनगर, सोमनाथनगर, मांजरेकर कॉलनी, मारुती कॉलनी, श्रीनाथनगर, गोकुळनगर, समर्थ कॉलनी, सिंडिकेट कॉलनी, शिवमनगर, लक्ष्मीनगर, विजयनगर, गणेशपूर रोड आदी भागांमध्ये स्थायिक होणाऱया नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बेळगाव शहरापासून अवघे चार ते पाच कि. मी. अंतर असल्याने हा परिसर लोकवस्तीसाठी उपयुक्त ठरत आहे. शिवाय हिंडलगा ग्राम पंचायतीमार्फत रस्ते, गटारी, पाणी आदी मूलभूत गरजांसह घरगुती गॅस जोडणीची सोय करून दिली आहे. त्यामुळे बेळगावसह महाराष्ट्रातील नागरिकांचा ओढा हिंडलग्याच्या दिशेने वाढला आहे. पण ज्याप्रमाणे लोकवस्ती वाढू लागली आहे, त्याप्रमाणेच कचऱयाची वाढती समस्यादेखील ग्रा. पं. साठी डोकेदुखीची ठरत आहे.
घरगुती कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रा. पं. ने घंटागाडीची सोय केली आहे. तरीही बहुतांश नागरिक महिन्याकाठी द्यावे लागणारे शुल्क वाचविण्यासाठी आपला कचरा घंटागाडीकडे देऊन सहकार्य करण्याऐवजी रस्त्याकडेला प्लास्टिक पिशवीत भरून कोठेही फेकण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. परिणामी ग्रा. पं. समोर स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवाय ठिकठिकाणी कचराकुंड तयार झाल्याने परिसरातील रहिवाशांसह वाहनधारकांना तीव्र दुर्गंधीसह गलिच्छ वातावरणाचा सामना करावा लागत होता. ग्रा. पं. कडून वारंवार आवाहन करूनही नागरिकांनी मात्र स्वच्छता राखण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले होते.
याबाबत स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी वाढल्याने ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी अनोखी शक्कल लढवित कचऱयाची समस्या उत्तमरित्या निकालात काढली आहे. यासाठी ग्रा. पं. मार्फत ज्या ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता पसरविली जात होती, असा परिसर स्वच्छ करून पेव्हर्स बसविले जात आहेत. रस्त्याकडेला नागरिकांना बसण्यासाठी बाकडय़ांची सोय केली आहे. कचरा टाकण्यासाठी येणाऱया रहिवाशांचे मनपरिवर्तन करण्याच्या उद्देशाने ठिकठिकाणी राष्ट्रपुरुषांचे फलक लावून सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला असून नागरिकांनी लाजून या ठिकाणी कचरा टाकणे बंद केले आहे. त्यामुळे पूर्वी गलिच्छ वाटणारा गणेशपूर रस्ता आता मोकळा श्वास घेत आहे. शिवाय कचऱयामुळे पसरणारी दुर्गंधी कमी झाल्याने ग्रा. पं. च्या या उपक्रमाबाबत राहिवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. संपूर्ण गावामध्ये हा उपक्रम राबवून हिंडलग्याला निर्मल ग्राम बनविण्याची मागणी होत आहे.
नागरिकांचे सहकार्य आवश्यक

ग्रा. पं. कार्यक्षेत्रात कचऱयाची समस्या गंभीर बनली होती. घंटागाडीची सोय करूनही नागरिक रस्त्याकडेला कचरा टाकून अस्वच्छता पसरवत होते. त्यामुळे दुर्गंधीसह रहिवाशांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत होता. परिणामी तक्रारी वाढल्याने कचऱयाची समस्या कायमची दूर करण्यासाठी कचराकुंड निर्माण झालेल्या ठिकाणी पेव्हर्स बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. कचरा टाकणाऱयांना पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून नागरिकांनी घंटागाडीकडे घरगुती कचरा देऊन सहकार्य करावे.
– नागेश मन्नोळकर, ग्रा. पं. अध्यक्ष









