एकत्र राहिलेलया महिला-पुरुषाचे नाते विवाहासारखेच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत विवाहाशिवाय जन्माला आलेल्या मुलांनाही वडिलांच्या मालमत्तेत हक्क असल्याचे म्हटले आहे. जर महिला आणि पुरुष दीर्घकाळापर्यंत एकत्र राहिले तर त्याला विवाहासारखेच मानले जाईल आणि या नात्यातून जन्माला आलेल्या मुलामुलींना वडिलांच्या मालमत्तेत अधिकार मिळणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. केरळ उच्च न्यायालयाने एका युवकाला त्याच्या वडिलांच्या मालमत्तेत हिस्सेदार मानले नव्हते, कारण त्याच्या आईवडिलांनी विवाह केला नव्हता. दोघांचा विवाह झाला नसला तरीही दोघे दीर्घकाळापर्यंत पती-पत्नीप्रमाणेच एकत्र राहिले आहेत. अशा स्थितीत जर डीएनए चाचणीत हे मूल या दोघांचेच आहे हे सिद्ध झाले तर मुलाचा वडिलांच्या मालमत्तेवर पूर्ण हक्क असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
उच्च न्यायालयाचा निर्णय पालटविला
केरळच्या एका व्यक्तीने स्वतःच्या वडिलांच्या मालमत्तेच्या झालेल्या वाटणीत हिस्सा न मिळाल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अनौरस अपत्य म्हणून हिस्सा दिला जात नसल्याचे त्याने म्हटले होते. ज्या व्यक्तीच्या मालमत्तेवर हक्क दर्शविला जात आहे, त्याच्याशी संबंधित अर्जदाराच्या आईने विवाह केला नव्हता. अशा स्थितीत युवकाला परिवाराच्या मालमत्तेत हिस्सेदार मानले जाऊ शकत नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले होते.
लिव्ह इन रिलेशनशिप
2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिली होती. तसेच घरगुती हिंसा अधिनियम 2005 मधील कलम 2 (फ) मध्ये देखील लिव्ह इन रिलेशनशिपला जोडले होते. म्हणजेच लिव्ह इनमध्ये राहणारे जोडपे देखील घरगुती हिंसेची तक्रार नोंदवू शकते.









