भारत-द.आफ्रिका तिसरी टी-20 लढत आज
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
दोन सामने जिंकून बहरात असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना येथे आज (मंगळवारी) होत असून स्पिनर्सचे निष्प्रभ प्रदर्शन, फॉर्ममध्ये नसलेले सलामीवीर व स्वतः कर्णधार रिषभ पंतची प्रभावहीन कामगिरी या गोष्टी मनात ठेवत भारतीय संघ मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आत्मविश्वास उंचावलेला द.आफ्रिका संघ मात्र याच सामन्यात मालिकाविजय निश्चित करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल. सायंकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
पाहुणा संघ मालिकेत सध्या 2-0 असा आघाडीवर आहे. या मालिकेआधी भारताने सलग 12 सामने जिंकले होते. पण त्यांची ही मालिका खंडित करीत दक्षिण आफ्रिकेने दोन्ही सामन्यात दणदणीत विजय मिळविले. पंतचा भारतीय संघ अनेक आघाडय़ावर झगडत असून कच्चे दुवे दूर करण्यासाठी केवळ एकच दिवस त्यांना मिळाला आहे. गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारताला पहिला सामना गमवावा लागला तर दुसऱया सामन्यात फलंदाजांनी निष्प्रभ प्रदर्शन केले. यातून त्यांना अगदी झटपट सावरावे लागणार आहे.
सलामीवीराचे अपयश
भारतीय सलामीवीरांना पॉवरप्लेमध्ये उत्तम सुरुवात करून देण्यात अपयशच आले आहे. इशान किशनने बऱयापैकी कामगिरी केली असली तर ऋतुराज गायकवाडच्या (23 व 1) अपयशाने, दर्जेदार जलद गोलंदाजांविरुद्धच्या त्याच्या तंत्राबद्दल आणि जलद सुरुवात करून देण्याच्या क्षमतेबद्दल शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. श्रेयस अय्यरही वेगवान गोलंदाजांविरुद्ध असुरक्षित दिसून आला असून त्याने सुरुवात चांगली केली असली तरी त्याला त्याचे मोठय़ा खेळीत रूपांतर करता आलेले नाही किंवा त्याला रनरेट वाढवण्यातही यश आलेले नाही. यामुळे मध्यफळीतील नंतर येणाऱया फलंदाजावर दडपण येऊ लागले आहे.
आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवणाऱया हार्दिक पंडय़ाने पहिल्या सामन्यात संघ सुस्थितीत असताना मोठे फटके आरामात मारले होते. पण दुहेरी स्वभाव असणाऱया कटकच्या खेळपट्टीवर त्याला अशी कामगिरी करणे जमले नाही. याशिवाय गोलंदाजीतही तो फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्याने या दोन सामन्यात 4 षटकांत 49 धावा दिल्या.
केएल राहुलच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व मिळालेल्या रिषभ पंतलाही अद्याप जोम दाखविता आलेला नाही. आतापर्यंतच्या 45 टी-20 सामन्यात त्याने 23.9 च्या सरासरीने व 126.6 च्या स्ट्राईकरेटने धावा जमविल्या असून त्यात केवळ 3 अर्धशतकांचा समावेश आहे. राष्ट्रीय संघाचा भावी कप्तान म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. पण नेतृत्वातही त्याला पुरेसा आत्मविश्वास दाखवता आलेला नाही. अनुभवी व फिनिशरचा लौकीक मिळविणाऱया दिनेश कार्तिकऐवजी अक्षर पटेलला बढतीवर पाठविण्याचा त्याचा निर्णय बुचकळय़ात टाकणारा होता. यावर्षी ऑस्ट्रेलियात विश्वचषक स्पर्धा होत असून या यष्टिरक्षक-फलंदाजांकडून बऱयाच अपेक्षा केल्या जात आहेत. एकहाती सामना जिंकून देण्याची त्याच्यात क्षमता आहे, ती दाखवून देत सहकाऱयांत प्रेरणा निर्माण करण्याची कामगिरी त्याला करावी लागेल.
गोलंदाजांत अक्षर पटेल व यजुवेंद्र चहल या स्पिन दुकलीकडून मोठी निराशा झाली आहे. त्यांनी अनुक्रमे 6 व 5 षटकांत 75 व 59 धावा दिल्या आहेत. त्यामुळे तिसऱया सामन्यात यापैकी एकाला संघाबाहेर ठेवले जाण्याची जास्त शक्यता आहे. आयपीएलमध्ये पर्पल कॅपचा मान मिळविणाऱया चहलवर डेव्हिड मिलर, व्हान डर डय़ुसेन, हेन्रीच क्लासेन यांनी हल्ला चढवत त्याच्यावर खूप दडपण आणले आहे. या दोघांच्या अपयशामुळे संघव्यवस्थापन युवा लेगस्पिनर रवी बिश्नोई किंवा अष्टपैलू वेंकटेश अय्यर यापैकी एकाला संधी देण्याचा विचार करण्याची अपेक्षा आहे. अय्यर केकेआरसाठी सलामीला खेळत होता, येथे त्याला मध्यफळीत खेळवले जाऊ शकते.
भुवनेश्वर कुमार वगळता अन्य भारतीय गोलंदाजांना ब्रेकथ्रू मिळवण्यात अपयशच आले आहे. पहिल्या सामन्यात 4 तर दुसऱया सामन्यात 6 बळी भारताने मिळविले. पण त्यात भुवनेश्वरचाच प्रमुख वाटा होता. एखादे चांगले षटक गेल्यानंतर पुढील एक-दोन षटकात भरपूर धावा देण्याची सवय भारतीय गोलंदाजांना बदलावी लागेल. अशा स्थितीत नवोदित उमरान मलिकला संधी देण्याचाही विचार व्यवस्थापनाकडून होऊ शकतो.
द.आफ्रिकन संघ मात्र पूर्ण फॉर्ममध्ये असून फलंदाजी-गोलंदाजी दोन्ही विभागात त्यांनी चमकदार प्रदर्शन केले आहे. पहिल्या सामन्यात मिलर, डय़ुसेन यांनी तर दुसऱया सामन्यात क्लासेनने निर्णायक फलंदाजी करीत संघाला यश मिळवून दिले. याशिवाय कर्णधार बवुमानेही रविवारच्या सामन्यात उत्तम साथ देण्याचे काम केले. गोलंदाजीत रबाडा, नॉर्त्जे, पार्नेल यांनीही अपेक्षित कामगिरी केली आहे.
संभाव्य संघ ः भारत ः रिषभ पंत (कर्णधार), गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, वेंकटेश अय्यर, चहल, अक्षर पटेल, बिस्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
द.आफ्रिका ः तेम्बा बवुमा (कर्णधार), डी कॉक, रीझा हेन्ड्रिकस, क्लासेन, केशव महाराज, मॅरक्रम, मिलर, लुंगी एन्गिडी, नॉर्त्जे, पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, रबाडा, शमसी, स्टब्स, व्हान डर डय़ुसेन, मार्को जान्सन.
सामन्याची वेळ ः सायंकाळी 7.00 पासून.









