दुसऱया सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना निवडता येणार कोणतेही विषय
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठ (आरसीयू) ने केलेल्या कन्नड सक्तीला सर्वच स्तरातून तीव्र विरोध झाला. त्यामुळे अखेर नाईलाजास्तव विद्यापीठाला कन्नड सक्तीचा आपला हट्ट सोडावा लागला आहे. त्यामुळे दुसऱया सेमिस्टरला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता कोणतेही विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
राज्य सरकारने यावषीपासून पदवी अभ्यासक्रमाला नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी) लागू केले. एनईपीचा आधार घेत आरसीयूकडून कन्नड सक्ती करण्यात आली होती. याचा फटका मराठीसह उर्दू, हिंदी, तुळू, तमिळ भाषिकांनाही बसत होता. सीमाभागात तर कन्नड सक्तीला तीव्र विरोध करण्यात आला. काही शिक्षकांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत न्याय मिळवून घेतला.
कोणतेही विषय निवडण्याचे स्वातंत्र्य
नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना कोणताही विषय घेण्याचे स्वातंत्र्य असतानाही त्यांच्यावर कन्नडची सक्ती करण्यात येत होती. पहिल्या सत्राच्या शेवटच्या काळात कन्नड सक्ती मागे घेण्यात आली. परंतु चन्नम्मा विद्यापीठाकडून दुसऱया सत्रात विषय बदलण्यास आडकाठी आणली जात होती.
त्यामुळे हिंदी, मराठी, उर्दू प्राध्यापकांनी या विरोधात जोरदार आवाज उठविला होता. यामुळे विद्यापीठावर टीकेची झोड उठली होती.
याचेच फलित म्हणून 11 जून रोजी आरसीयूने एक परिपत्रक काढले असून त्याद्वारे दुसऱया सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना कोणताही विषय निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कन्नड सक्ती राहणार नाही.









