पंधरा दिवसात समस्यांचे निवारण न झाल्यास आंदोलनाचा इशारा : सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन विरले हवेत

खानापूर : जांबोटीजवळील विजयनगर गवळीवाडय़ाला जाणाऱया रस्त्यावर चिखल झाल्याने चालत जाणेही मुश्कील झाले आहे. हा वाडा अनेक समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. जांबोटी ग्राम पंचायतीने या वाडय़ाच्या सुविधांकडे साफ दुर्लक्ष केले असून येथील कुटुंबीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, यथील समस्या सोडविण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याने विजयनगर येथील रहिवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
जांबोटी परिसरातील दुर्गम भागात गवळी लोक राहत होते. त्यांना सुविधा मिळाव्यात म्हणून जांबोटीजवळील माळावर नव्याने वसाहत करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. 2006 साली दिगंबर पाटील आमदार असताना त्यांचे या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. त्यावेळी त्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र, मुख्य रस्त्यापासून गवळीवाडय़ावर येणारा संपर्क रस्ताही करण्यात आलेला नाही. पहिल्याच पावसात या रस्त्यावर गुडघाभर चिखल झाल्याने चालत जाणेही मुश्कील झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेला जाणे बंद केले आहे. या रस्त्यावर खडीकरण करणे गरजेचे होते. पावसाळय़ात गवळी लोक जांबोटी ग्राम पंचायतीकडे हा रस्ता करण्याची मागणी करत आहेत. मात्र, याकडे जांबोटी ग्राम पंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गेली काही वर्षे चिखलातूनच वाट काढत ते जीवन जगत आहेत. या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी एक विहीर खोदून दिली होती. त्या विहिरीत नाल्याचे पाणी मिसळत असूनही त्याच पाण्याचा वापर जनतेला करावा लागत आहे. यामुळे अनेक आजारांनाही सामोरे जावे लागत आहे.
गवळीवाडय़ाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष येथील गवळीवाडय़ावरील रामू आवणे यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले की, आम्हाला स्थलांतरित केल्यानंतर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप एकही सुविधा येथे उपलब्ध करून दिलेली नाही. जांबोटी ग्रा. पं.कडे वारंवार मागणी करूनही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ग्रा. पं.ना कोटीच्या घरात फंड किंवा निधी येतो. मात्र, अवघा अर्धा कि. मी. रस्ता करण्यात आला नाही. सरकार शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या योजना आणत आहे. मात्र, आम्हाला आजही विहिरीचे पाणी प्यावे लागत आहे. 500 लोकवस्तीच्या या वाडय़ाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. येत्या 15 दिवसात समस्या सोडविल्या नाहीत तर तालुक्यातील समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.









