वृत्तसंस्था/ नॉटींगहॅम
येथे सुरू असलेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत रविवारी खेळाच्या तिसऱया दिवशी न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील 553 या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना यजमान इंग्लंडने उपाहारापर्यंत पहिल्या डावात 2 बाद 195 धावा जमविल्या होत्या. ऑली पॉप 84 तर कर्णधार रूट 35 धावांवर खेळत होते.
या मालिकेतील लॉर्डस् मैदानावरील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकून न्यूझीलंडवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील शेवटची कसोटी 23 जून पासून हेडेंग्ले मैदानावर खेळविली जाणार आहे.
या दुसऱया कसोटीत डॅरेल मिशेल आणि ब्लंडेल यांनी शानदार शतके झळकविल्याने न्यूझीलंडने पहिल्या डावात 145.3 षटकांत 553 धावांचा डोंगर उभा केला. मिशेलचे द्विशतक केवळ 10 धावांनी हुकले. त्याने 318 चेंडूत 4 षटकार आणि 23 चौकारांसह 190 तर ब्लंडेलने 198 चेंडूत 14 चौकारांसह 106, कर्णधार लॅथमने 6 चौकारांसह 26, यंगने 9 चौकारांसह 47, कॉनवेने 5 चौकारांसह 46, निकोल्सने चार चौकारांसह 30, ब्रेसवेलने 9 चौकारांसह 49 धावा झळकविल्या. इंग्लंडतर्फे अँडरसनने 3, ब्रॉड, स्टोक्स आणि लिच यांनी प्रत्येकी 2 तर पॉटस्ने एक गडी बाद केला.
इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाला सावध सुरूवात करताना दुसऱया दिवसाअखेर 26 षटकांत 1 बाद 90 धावा जमविल्या होत्या. सलामीचा क्रॉऊली बोल्टच्या गोलंदाजीवर 4 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर लिस आणि पॉप यांनी दुसऱया गडय़ासाठी 141 धावांची भागिदारी केली. रविवारी तिसऱया दिवसाच्या खेळाला प्रारंभ केल्यानंतर न्यूझीलंडच्या हेन्रीने लिसला मिशेलकरवी झेलबाद केले. त्याने 125 चेंडूत 11 चौकारांसह 67 धावा जमविल्या.
पॉपने जीवदानाचा फायदा घेत आपले अर्धशतक शनिवारी पूर्ण केले होते. लिसचे कसोटीतील पहिले अर्धशतक नोंदविले गेले. रूट आणि पॉप यांनी उपाहारापर्यंत तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 48 धावांची भागिदारी केली होती. पॉपने आपल्या शनिवारच्या धावसंख्येत आणखी 33 धावांची भर घातली तर रूट 7 चौकारांसह 35 धावांवर खेळत होता. खेळाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडने 105 धावा जमविताना एकमेव फलंदाज गमविला. उपाहारावेळी इंग्लंडने 54 षटकांत 2 बाद 195 धावा जमविल्या होत्या. न्यूझीलंडतर्फे हेन्री आणि बोल्ट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. इंग्लंडचा संघ अद्याप 358 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे आठ गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड प. डाव 145.3 षटकांत सर्वबाद 553, इंग्लंड प. डाव 54 षटकांत 2 बाद 195 (लिस 67, क्रॉऊली 4, पॉप खेळत आहे 84, रूट खेळत आहे 35, बोल्ट 1-43, हेन्री 1-54)









