1.5 लाख कोटींचा व्यवहार ः ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत 96 विमाने देशातच तयार करण्याची योजना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय हवाई दल 114 लढाऊ विमाने घेण्याच्या तयारीत असून त्यापैकी 96 विमानांची निर्मिती ‘आत्मनिर्भर’ योजनेंतर्गत भारतातच केली जाणार आहे. उर्वरित 18 विमाने या प्रकल्पासाठी निवडलेल्या परदेशी विपेत्याकडून आयात केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत प्रकल्प आराखडा तयार करत आहे. भारतीय हवाई दलाने ‘बाय ग्लोबल अँड मेक इन इंडिया’ योजनेंतर्गत 114 मल्टीरोल फायटर एअरक्राफ्ट (एमएफए) घेण्याची योजना आखली असून भारतीय कंपन्यांना परदेशी विपेत्याशी भागिदारी करता येणार आहे.
भारतीय हवाई दलाने परदेशी विपेत्यांसोबत बैठक घेतली आणि मेक इन इंडिया प्रकल्प कसा राबवायचा यावर त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. योजनेनुसार, सुरुवातीची 18 विमाने आयात केल्यानंतर, पुढील 96 विमाने देशातच तयार केली जातील. या व्यवहारासाठीची रक्कम 1.5 लाख कोटी इतकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बोईंगसारख्या कंपन्यांचा सहभाग अपेक्षित
शेवटच्या 60 विमानांची मुख्य जबाबदारी भारतीय भागीदाराची असेल आणि सरकार त्यांना भारतीय चलनातच निधी पुरवणार आहे. भारतीय चलनात निधी दिल्यामुळे विपेत्यांना प्रकल्पातील 60 टक्क्मयांहून अधिक साहित्य ‘मेक-इन-इंडिया’ असेल. साहजिकच या व्यवहारामुळे मुख्य कंपनीबरोबरच विमानासाठीचे विविध भाग बनवणाऱया छोटय़ा-मोठय़ा कंपन्यांनाही बळकटी मिळणार आहे. बोईंग, लॉकहीड मार्टिन, साब, मिग, इर्पुट कॉर्पोरेशन आणि डसॉल्ट एव्हिएशनसह जागतिक विमान उत्पादक या निविदांमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
लढाऊ विमान प्रकल्प प्रगतीपथावर
पाचव्या पिढीचा मध्यम लढाऊ विमान प्रकल्प समाधानकारक गतीने प्रगतीपथावर आहे. परंतु ऑपरेशनल भूमिकेत येण्यासाठी त्याला बराच वेळ लागेल. भारतीय हवाई दल त्यांच्या लढाऊ विमानांच्या गरजेसाठी एक किफायतशीर उपाय शोधत आहे. या ‘आत्मनिर्भर’ योजनेच्या माध्यमातून कमी खर्च आणि सेवेसाठी अधिक क्षमता प्रदान करण्याचा उद्देश डोळय़ासमोर ठेवण्यात आला आहे. आयएएफ राफेल लढाऊ विमानांच्या ऑपरेशनल उपलब्धतेबद्दल अत्यंत समाधानी असून भविष्यातील विमानांमध्येही अशीच क्षमता आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.









