अध्याय अठरावा
भगवंत म्हणाले, खरा संन्यासी आत्मज्ञानी असतो त्याला वादविवादाची गोष्ट दृष्टीपुढेसुद्धा नको असते. वादविवादात बोलता बोलता दुसऱयाचे मन दुखेल, किंवा आपल्याच अंतःकरणात क्रोध उत्पन्न होईल म्हणून तो शब्दच बोलत नाही. कोणी निंदा करतात, कोणी तिरस्कार करतात, कोणी अपमान करतात, तरी तो आत्मस्थित राहून सहन करतो. प्राणिमात्रामध्ये एकच आत्मा भरलेला आहे, अशी त्याची भावना असल्यामुळे त्याला त्याची खंत वाटत नाही. तसेच याच्या संसर्गापासून प्राणिमात्रांनाही उद्वेग प्राप्त होत नाही. भूतात्मा सर्व भूतांमध्ये भरलेला आहे, हे लक्षात आणून तो मोठय़ाने भाषणसुद्धा करीत नाही. कोणत्याही जीवाची आकृती असो, तिचा अपमान करावयाचाच नाही कारण सर्व प्राणिमात्रांमध्ये असलेला श्रीहरिच त्याला दिसत असतो. सर्वांचा आत्मा एकच आहे आणि सर्व प्राण्यांची शरीरेसुद्धा एकाच समान तत्त्वांनी बनलेली आहेत म्हणून त्यामध्ये मूलद्रव्यसुद्धा एकच आहे, असा विचार आत्मज्ञानी संन्याशी करत असतो. केवळ पशूप्रमाणे देहाचा अहंकारी होऊन तो कोणाशीही वैर करीत नाही. ज्ञानस्वरूप आत्मा हा प्रकृतीच्या पलीकडे असतो, तोच सर्व प्राणिमात्रांचा आत्मा असून माझ्यामध्येही तोच राहतो, अशा समजुतीने जो एकात्मता राखतो.
खरोखर माझंच आत्मस्वरूप जर सर्व प्राणिमात्रांमध्ये भरलेले आहे, तर त्याला आत कोण, आणि इतर कोण ? आणि वैर तरी कोणाशी आणि का करावयाचे ? असा प्रश्न पडतो. हजारो घागरीमध्ये पाणी भरलेले असले तरी त्या प्रत्येकीमध्ये एकाच चंद्राचे प्रतिबिंब पडते त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्रात एकच आत्मा भरलेला आहे. प्राण्यांच्या आकृती भिन्न भिन्न दिसतात, पण मूळ मायेच्या ठिकाणी त्या साऱया एकच आहेत.
ज्याप्रमाणे अलंकारांतील आकारामुळे सुवर्णामध्ये भेद नसतो. किंवा मातीच्या मूर्ती केल्या, तर त्या निरनिराळय़ा आकारांनी पूजेला पात्र होतात, पण त्या साऱया मातीच्याच असतात. त्याप्रमाणेच भगवंतामध्ये निरनिराळय़ा प्राण्यांचा भास होतो किंवा सुतांत सूत विणून वस्त्र केले म्हणजे त्याला शेला, दुपेटा, पातळ, इत्यादि म्हणतात. त्याप्रमाणे येथे ब्रह्मच संसाराच्या रूपाने साकार भासत असते. ह्याप्रमाणे साकार काय आणि निराकार काय, खरोखर दोन्ही ब्रह्मच. असा ज्याच्या ज्ञानाचा निर्धार असतो, त्याच्या आहाराबद्दल सांगायचं झालं तर, जेव्हा काही खावयास मिळत नाही, त्यावेळेस तो दुःखी होत नाही किंवा अन्नासाठी तळमळत नाही. इतका त्याचा मनोनिग्रह बळकट असतो. तसेच उत्तम आहार मिळाला म्हणून त्याच्या मनाला हर्षही होत नाही. कारण आपल्या कर्माप्रमाणे सर्व गोष्टी असतात हे वर्म त्याला माहीत असते.
तात्पर्य, मिळणे किंवा न मिळणे हे खरोखर दैवाधीन आहे हे तो जाणून असतो. म्हणून सुख किंवा दुःख त्याच्या चित्ताला शिवतच नाही. प्राण्याला होणारा लाभ दैवानुसारच होत असतो, असे जर त्याला निश्चयेकरून कळलेले असते, तर मग तो भिक्षेसाठी तरी का हिंडतो? याचं उत्तर असं की, आश्रमधर्म पाळण्यासाठी भिक्षेसाठी आवश्य फिरणं आवश्यक आहे. संन्याशाच्या धर्माला मधुकरी ही अत्यंत योग्य आहे.
साधकांनासुद्धा आहारासाठी आवश्य हिंडावे लागते. कारण, आहाराशिवाय त्यांचे चित्त चंचल होऊ लागते. त्यांनी गोडपणाची आसक्ती सोडून भिक्षेचा प्रयत्न करावा. कारण आहाराशिवाय त्यांचे मन क्षीणच होत असते. आहाराशिवाय साधकांना श्रवण-मनन घडू शकत नाही, ध्यान-चिंतन करवत नाही व अनुसंधानही टिकत नाही.
संन्याशाला जर ध्यान घडले नाही, तर त्याच्या आश्रमधर्माचे तारू बुडून जाते. म्हणून आपल्या हिताकरिताच त्याला भिक्षेला जाणे भाग पडते. गोड मिष्टान्न मिळावे अशी जिभेची गोडी न धरता परमार्थ साधण्यासाठी भिक्षेचीच आवड धरावी. आहार सेवन केला असता साधकाला साधन घडते. साधन घडले म्हणजे ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानप्राप्तीने मोक्षाचा लाभ होतो.
क्रमशः







