कुर्डुवाडी/प्रतिनिधी
पंढरपूराहून पांडुरंगाचे दर्शन घेऊन गावाकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या एसटी बसला भरधाव वेगाने अचानक आडवा आलेल्या डंपरमुळे झालेल्या अपघातात चालक, वाहक यांच्यासह १६ वारकरी जखमी झाले आहेत. ही घटना रविवार दिनांक १२ रोजी सकाळी ११ वा. सुमारास कुर्डुवाडी – शेटफळ रोडवरील लऊळ शिवारात घडली. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात होता होता टळला.
अपघातात, एसटी चालक प्रकाश तुकाराम मुंढे रा. पाताळगंगा ता. कंदार.जिल्हा नांदेड, वाहक सचिन विठ्ठल ढोले रा.संगमनेर जि.अ.नगर, द्रोपदी यादव (वय ६० रा. मांजलगाव), साहेबराव कोळेकर (वय ६० रा. मोरेवाडी जि. बीड), भीमराव गव्हाणे (वय ६५ बोरगाव जि. बीड), नामदेव मदने (वय ६० रा. जवळा जि. धारूर), सुधाकर सोळंके (वय ५० हिंगोली जि. बीड), कोंडीबा गव्हाणे (वय ५० रा. भोगाव जि. परभणी), उद्धव दराडे (वय ६५ रा. लोहगावरोड परभणी), कुसुम मुंडे (वय ५५ रा. परळी), सविता मुंडे (वय ४५ रा. परळी), बाजीराव सावंत (वय ६५ रा. बोरी जि. हिंगोली), माणिक ढेगळे (वय ७९ रा. पिंपळवाडी ता.वाशी), दिलीप पांडे (वय ७५ रा. शिवराम नगर परभणी), उत्तम लाटे (वय ६५ रा. ममदापूर जि.परळी), देविदास कदम (रा. ममदापूर जि. परळी) हे जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपुरच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन वारकरी मिरज- मांजलगाव बस क्रमांक एम. एच. ०६ एस. ८३७१ बसने गावाकडे निघाले होते. या बसमधून सुमारे ७० प्रवासी प्रवास करीत होते. एस.टी.बस कुर्डुवाडी – शेटफळ रोडवर लऊळ ता.माढा हद्दीत आली असता. या रोडवरी डांबर मिक्सर प्लाॅन्ट मधून टिपर (क्रमांक एम. एच. ४५ डी.१०५५) च्या चालकाने भरधाव वेगाने निष्काळजीपणाने डंपर रस्त्यावर आणला. अचानकपणे डंपर रस्त्यावर आल्याचे पहातातच बस चालकाने बसवर नियंत्रण मिळविण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र डंपर एकदम समोर आल्यामुळे धडक झाली. यामध्ये चालक, वाहक व १४ वारकरी असे एकूण १६ जण जखमी झाले. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना होता होता टळली.
जखमी वारकऱ्यांना कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कुर्डुवाडी आगाराच्या स्पेशल एस टी बस मधून गावाकडे सोडण्याची व्यवस्था केली असल्याचे आगारप्रमुख मिथुन राठोड यांनी सांगितले.
यावेळी जखमी प्रवाशांना आगारप्रमुख मिथुन राठोड, स्थानक प्रमुख विजय हांडे, वाहतूक निरीक्षक शरद वाघमारे, सहा. वाहतूक निरीक्षक शिवराज पाटील व कामगार संघटनेचे अध्यक्ष राजु नवले यांनी ५०० रूपये रोख मदत दिली. तसेच पोलीस नाईक सोमनाथ गायकवाड यांनी जखमी वारकऱ्यांना चहा-बिस्कीट व पाणी दिले.