भारताविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यातील विजयामुळे पाहुण्या संघाचे मनोबल उंचावले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रॅस्सी व्हान डेर डय़ुसेनला अलीकडेच संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सतर्फे फारसे सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. पण, डगआऊटमधून अगदी जवळून सामने पाहिले, त्याचा लाभ झाला, असा त्याचा होरा आहे. त्या अनुभवामुळे भारतीय भूमीत यजमान संघाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात मोठय़ा धावसंख्येचा देखील सहज पाठलाग करता आला, असे तो म्हणतो.
रॅस्सी व्हान डेर डय़ुसेनने अवघ्या 46 चेंडूत 75 धावांची आतषबाजी केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने त्या लढतीत 212 धावांचे आव्हान सहज पार केले. यंदा आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सतर्फे सहभागी झालेल्या डय़ुसेनला केवळ 3 सामने खेळण्याची संधी मिळाली. पण, पूर्ण मोहिमेत तो संघासमवेत सहभागी होता.
‘दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारतातील वातावरण खूपच भिन्न स्वरुपाचे आहे. मात्र, आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने दोन महिने भारतात राहिलो, त्याचा लाभ झाला. आयपीएलमध्ये खेळण्याची संधी कमी मिळाली असली तरी जे गोलंदाज खेळत होते, त्यांच्या मनात काय आडाखे असतील, याचा मी सखोल विचार करत होतो. यंदा आयपीएल स्पर्धेत माझे अनेक राष्ट्रीय संघसहकारी खेळत होते. त्याचाही पहिल्या टी-20 सामन्यात लाभ झाला’, असे निरीक्षण त्याने पुढे नोंदवले. सध्या दक्षिण आफ्रिकन संघात समाविष्ट असलेले क्विन्टॉन डी कॉक, डेव्हिड मिलर, कॅगिसो रबाडा व ऍनरिच नोर्त्झे यांचा आयपीएलमधील विविध प्रँचायझीत समावेश होता.
पहिल्या टी-20 सामन्यात मिलरसमवेत सामना जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला असला तरी प्रारंभिक टप्प्यात आपल्याला झगडावे लागले होते, असे डय़ुसेनने याप्रसंगी नमूद केले. ‘मी पहिल्या टप्प्यात दडपणाखाली होतो. पण, मिलरने आयपीएलमधील उत्तम फॉर्म येथेही कायम राखला आणि त्याचा मलाही लाभ झाला. गोलंदाजांवर दडपण निर्माण करण्यात मला यश लाभले. मी दोन-एकवेळा सुदैवी ठरलो. पण, हा खेळाचा एक भागच असतो’, असे त्याने याप्रसंगी नमूद केले. डावातील 16 व्या षटकात 29 धावांवर असताना श्रेयस अय्यरने त्याला जीवदान दिले होते.
‘श्रेयसने तो झेल घेतला असता तर कदाचित चित्र बदलले असते. मात्र, मी त्यावेळी बाद झालो असतो तरी आमचे अनेक अव्वल फलंदाज बाकी होते. मी फक्त मला जीवदान लाभले, त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचे लक्ष्य डोळय़ासमोर ठेवले आणि त्यात उत्तम यश मिळाले’. असे डय़ुसेन पुढे म्हणाला.
भारत, द. आफ्रिकन संघ ओडिशामध्ये दाखल
भुवनेश्वर ः उद्या (रविवार दि. 12) खेळवल्या जाणाऱया दुसऱया टी-20 सामन्याच्या पार्श्वभूमीवर, भारत व दक्षिण आफ्रिकेचे संघ शुक्रवारी कडक सुरक्षाव्यवस्थेत ओडिशामध्ये दाखल झाले. दोन्ही संघांचे दुपारी 2 वाजता भुवनेश्वरमधील बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी विमानतळावर चाहत्यांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती.
ओडिशा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱयांनी खेळाडूंचे स्वागत केले. खेळाडूंना तेथून लगोलग हॉटेल्सकडे नेण्यात आले. या सामन्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून तिकीट विक्री केली गेली असून सामन्याला महनीय व्यक्तींची उपस्थिती अपेक्षित असल्याचे ओडिशा क्रिकेट संघटनेचे सचिव संजय बेहरा यांनी नमूद केले.









