सकाळी जॉगिंगवेळी घडला प्रकारच : उपजिल्हाधिकाऱ्यांनी हल्लेखोरांची केली धुलाई
सांगली शहरात उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. पहाटेच्या सुमारास जॉगिंगसाठी गेल्या असता उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला आहे. यावेळी गेडाम यांच्या हातावर चाकूचा वार झाला. याबाबत हर्षलता गेडाम यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सांगली शहरातल्या विश्रामबागच्या नेमिनाथनगर या ठिकाणी असणाऱ्या कल्पद्रुम क्रीडांगणावर पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी असणाऱ्या हर्षलता गेडाम या महिला अधिकार्यावर दोघा अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.
नेहमीप्रमाणे हर्षलता गेडाम या पहाटे पाचच्या सुमारास जॉगिंग करण्यासाठी ग्राऊंडवर गेल्या होत्या. जॉगिंग सुरू असताना मोटारसायकलवरून दोघे अज्ञात त्या ठिकाणी पोहोचले. त्यापैकी एकाने हर्षलता गेडाम यांना, चालतेस का असं विचारत त्यांच्या खांद्याला हात लावून ओढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गेडाम यांनी आपली छेडखाणी सुरू असल्याचं लक्षात येताच, दोघा हल्लेखोरांपैकी एकावर लाथेने प्रहार करत एकास खाली पाडले. त्यानंतर हल्लेखोर आणि गेडाम यांच्यामध्ये झटापट सुरू झाली. मात्र मार्शल आर्ट कला अवगत असणाऱ्या गेडाम यांनी जोरदार प्रतिहल्ला केल्याने दोघांनी पळ काढला. मात्र यादरम्यान एका हल्लेखोराकडून चाकूने हल्ला झाला. यामध्ये गेडाम यांच्या हातावर वार होऊन, त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
गेडाम यांच्या बाबतीत याआधीही छेडखानीचा प्रकार १७ मे रोजी घडला होता, दोघा अज्ञात पैकी एका अज्ञाताने गेडाम यांचा जॉगिंगच्या वेळेस पाठलाग करत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा येऊन छेडखानी करत प्राणघातक हल्ला केला आहे.मात्र सुदैवाने यामध्ये गेडाम बचावल्या आहेत. या घटनेनंतर गेडाम यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यांमध्ये धाव घेऊन अज्ञात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत आहेत,पण महिला उपजिल्हाधिकारयावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे