ग्रामसभेत सर्वानुमते ठराव, तलावाचे काम अपूर्ण ठेवल्याने निर्णय
जत/प्रतिनिधी
जत तालुक्यातील बागलवाडीतील येथील साठवण तलावाचे काम पूर्ण होत नसल्याच्या निषेधार्थ येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ग्रामसभेचा ठराव बागलवाडी ग्रामपंचायतने घेतला आहे.या ठरावाला सूचक बाबुराव बागल तर अनुमोदन बळवंत बागल यांनी दिले असून ठराव सर्वानुमते मंजूर झाला आहे.यामुळे जत तालुक्यात निवडणूक पूर्व खळबळ उडाली आहे.
बागलवाडी येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्यात आली.या सभेत मोकाशेवाडी हद्दीतील साठवण तलावाचे दहा-बारा वर्षे झाली तरी काम पूर्ण झाले नाही. त्यावर सभेत चर्चा करण्यात आली. हा तलाव पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करून सुद्धा शासन स्तरावर काही दाद दिली जात नाही. असे उपस्थित मतदारांनी मत मांडले.तलावाचे काम अपूर्ण असल्याने तलावाखालील पाणी पुरवठा विहीर कोरडी पडून पाण्याची टंचाई निर्माण होते.सदर तलाव पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे.तरी तलाव पूर्ण होण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात यावा असे उपस्थितांनी सांगितले.
परंतु सचिव यांनी असा ठराव शासनाच्या धोरणांशी विसंगत आहे असे मत मांडले. तरी लोकांच्या पिण्याचा पाणी प्रश्न असल्याने सभेत झालेल्या चर्चेप्रमाणे साठवण तलाव पूर्ण होण्याच्या दृष्टीने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकण्यात यावा त्यास ही सभा सर्वानुमते मंजुरी देत आहे. असे ग्रामपंचायत बागलवाडीच्या ठरावाच्या नक्कलमध्ये म्हटले आहे.यावर सरपंच व ग्रामसेवक यांच्या सह्या आहेत