जिल्हाधिकारी नोटीस करणार प्रसिध्द
कोल्हापूर प्रतिनिधी
जिह्यातील इचलकरंजीसह जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, पन्हाळा, मलकापूर, वडगाव या नऊ नगरपालिकांच्या सदस्यपदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर झाला. राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबत घोषणा करण्यात आली. त्यानुसार सोमवारी (दि. 13) संबंधित मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार नोटीस प्रसिध्द करणार आहेत.
एप्रिल 2020 ते मार्च 2022 या कालावधित मुदत संपणाऱया नगरपालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी घोषित केला. यामध्ये जिह्यातील इचलकरंजीसह नऊ नगरपालिकांचा समावेश आहे. आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार आज, शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून सदस्यपदांच्या आरक्षणाच्या सोडतीसाठी नोटीस प्रसिध्द करण्यात येणार आहे. ही नोटीस जिल्हाधिकारी व नगरपालिकांच्या वेबसाईटवरही प्रसिध्द केली जाणार आहे.
सोमवारी (दि. 13) मुख्याधिकाऱयांच्या उपस्थितीत नगरपालिका सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीमधील महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचा समावेश असणार आहे. बुधवारी (दि. 15) जिल्हाधिकाऱ्यांकडून आरक्षणाची अधिसुचना (कलम 10 नुसार) रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती, सुचना मागविण्यासाठी वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपालिकांच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाणार आहे. आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सुचना स्वीकारल्या जाणार असून त्यासाठी दि. 15 ते 21 जूनपर्यंत कालावधी असणार आहे. 24 जूनला आरक्षण सोडतीचा अहवाल विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासनाला पाठविण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तांकडून 29 जूनला नगरपालिकेच्या सदस्यपदाच्या आरक्षणास मान्यता दिली जाणार आहे. 1 जुलैला सदस्यपदांच्या आरक्षणाची अधिसुचना (कलम 10 नुसार) रहिवाशांच्या माहितीसाठी वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिकांच्या वेबसाईटवर जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रसिध्द करण्यात येणार आहे.
तरीही इचलकरंजी नगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर
इचलकरंजी नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले असून यासंदर्भातील कार्यवाही सुरु आहे. असे असताना इतर नगरपालिकांसोबत इचलकरंजी नगरपालिकेचाही आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. सध्या या ठिकाणी महापालिका नसून ती झाल्यावर पाहीले जाईल. तोपर्यंत नगरपालिकेनुसारच कार्यवाही सुरु ठेवावी, असे निर्देश आयोगाकडून जिल्हा निवडणूक विभागाला आल्याचे समजते.