घरापासून एक किलोमीटर अंतरावर अपघात : क्रेन चालकाचा पाठलाग करून पोलिसांच्या स्वाधीन
प्रतिनिधी/पलूस
येथील पलूस आमणापूर रोडवर दुचाकीला क्रेनने पाठीमागून धडक दिलेल्यान झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर तिचा पती गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरूवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर क्रेनचालक भरधाव वेगात पुढे निघून गेल्यानंतर संतप्त जमावाने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. अपघात झालेले ठिकाण व अपघातातील मृत महिलेचे घर हे अंतर केवळ एक किलोमिटर असल्याने घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेतली. काही मिनिटापूर्वी घरातून निघालेल्या आई-वडिलांचे घटनास्थळावरील अपघाताचे चित्र पहाताच मुलांसह नातेवाईकांनी केलेला अक्रोश हा ह्रदय हेलावणारा होता.
जयश्री प्रकाश माळी (45) असे मृत महिलेचे नाव आहे. तर प्रकाश सदाशिव माळी (55) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हे नात्याने दोघेही पती-पत्नी आहेत. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्ताने ते पलूसकडे गावात मोटारसायकलवरून बसून येत होते. दरम्यान हॉटेल रॉयल समोरील बाजूस असणाऱया द्राक्षबागेसमोर पाठीमागून भरधाव वेगात येणाऱया क्रेने त्यांना पाठीमागून धडक दिल्याने दोघेजण जागीच कोसळले. यामध्ये मृत महिला जय<श्री माळी यांच्या अंगावरून क्रेनचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश माळी हे बाजूला फेकले गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना सांगली येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी हवलवण्यात आले आहे. मृत जयश्री माळी यांच्यावर येथील ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. याबाबत रात्री उशीरा पलूस पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. क्रेन चालक अपघास्थळी न थांबता तो भरधाव वेगात तसाच पुढे निघून जात असताना पाठीमागून नागरीकांनी त्याचा पाठलाग केला व त्याला अडवून पोलिसांच्या स्वाधीन केले. मृत जयश्री माळी व प्रकाश माळी हे शेती करतात त्यांना एक मुलगा एक मुलगी सून, नात असा परिवार आहे.