चार दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक : रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरच रक्तदानाची वेळ : सामाजिक संघटनांनी रक्तदान करण्याचे आवाहन
प्रतिनिधी/मिरज
कोरोना काळात सांगली जिह्याला तारणहार ठरलेल्या शहरातील मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सध्या रक्ताचा प्रचंड तुडवडा निर्माण झाला आहे. गेल्या आठवडारापासून नव्याने रक्त संकलन ठप्प झाले असून, केवळ चारच दिवस पुरेल इतका रक्तसाठा शिल्लक आहे. येणाऱया आठवडाभरात रक्तासाठी रुग्णांना टाहो फोडण्याची वेळ येऊ नये, यासाठी रक्तदाते, सामाजिक संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयात रक्तदान करावे, असे आवाहन सिव्हील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना कालावधीत मिरज शासकीय रुग्णालय हजारो रुग्णांसाठी वरदान ठरले. सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी हे रुग्णालय फायद्याचे असल्याने शेकडो रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होतात. सांगलीचे वसंतदादा सर्वोपचार रुग्णालय आणि मिरज सिव्हीलसाठी मिरज शासकीय रुग्णालयात स्वतंत्र रक्तपेढी कार्यरत आहे. शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱया सर्वच रुग्णांना प्राधान्याने वेगवेगळ्या गटातील रक्त पुरवठा केला जातो. याशिवाय खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱया रुग्णांनाही अत्यल्प दरात रक्त उपलब्ध करुन दिले जाते.
मात्र, गेल्या आठवडाभरापासून शासकीय रुग्णालयात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. काही दिवसांपासून नव्याने रक्त संकलन प्रक्रियाही मंदावली आहे. विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तसेच शिबिरांतून संकलित केला जाणारा रक्तसाठाही अत्यल्प प्रमाणात आहे. मिरज शासकीय रुग्णालयात दररोज दहा ते पंधरा बाटल्या रक्ताची मागणी आहे. तसेच सांगलीच्या सिव्हील रुग्णालयाला येथूनच रक्त पुरवठा केला जातो. दररोजच्या मागणीच्या तुलनेत शिल्लक रक्तसाठाही संपुष्टात येत असून, रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायाने शासकीय रुग्णालयातील कर्मचारीच स्वतःहून रक्त देत आहेत. दैनंदिन गरज भागविण्यासाठी रक्तपेढीत सुमारे 30 ते 35 बाटल्या रक्त शिल्लक असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या रुग्णालयात केवळ चारच दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे, अशी माहिती सिव्हील प्रशासनाने दिली आहे.
रक्त तुडवडय़ाची भीषणता ओळखून शहरातील रक्तदाते, राजकीय, सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गणेश मंडळे, मॉर्निंग ग्रुप सदस्य यांच्यासह विविध घटकातील नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा. सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. शिबिरांमध्ये संकलीत होणारे रक्त शासकीय रुग्णालय रक्तपेढीस देणे आवश्यक आहे.
सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा
शासकीय रुग्णालयात शेकडो गरीब रुग्ण उपचार घेत आहेत. रक्त तुटवडय़ामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. दैनंदिन मागणीच्या तुलनेत रक्तसाठी शिल्लक नाही. शासकीय रुग्णालयातील कर्मचारीच वेळप्रसंगी रक्तदान करत आहेत. त्यामुळे शहरातील सामाजिक संस्था, संघटनांनीही पुढाकार घेऊन रक्तदान करावे. आपल्या रक्ताचा प्रत्येक थेंब एखाद्याचा जीव वाचवू शकते. – डॉ.रुपेश शिंदे, मिरज शासकीस रुग्णालय सहाय्यक अधिष्ठाता