माजी उपनगराध्यक्ष किरण कदम यांची टिका
प्रतिनिधी/गडहिंग्लज
सत्ता मिळाल्यावर विकासाच्या केवळ गप्पा मारण्यात 5 वर्षे घालवली. मंत्री हसन मुश्रीफ यांनी शहराच्या विकासाला कोठय़ावधीचा निधी दिला. पण हा निधी मिळाल्यानंतर काही मंडळींनी केवळ श्रेय लाटण्याचाच उद्योग केल्याची टिका राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष किरण कदम यांनी जनता दलाचे नाव टाळत पत्रकार बैठकीत केली.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून लाखे नगर येथे सांस्कृतिक हॉल (20 लाख), धनगर मंदीराजवळ सांस्कृतिक हॉल (20 लाख), मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक हॉल (20 लाख), कुंभार समाजासाठी सांस्कृतिक हॉल (10 लाख), विद्यानगर येथील खुली जागा विकसीत करणे (10 लाख), संकेश्वर रोड ते भैरी रोड जोडणारा रस्ता करणे (20 लाख) आदि कामांना मंजूरी मिळाल्याचे यावेळी कदम यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक हारुण सय्यद, सुरेश कोळकी, दिपक कुराडे, सिध्दार्थ बन्ने, गुंडय़ा पाटील, महेश सलवादे, अमर मांगले, संतोष कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना कदम यांनी गडहिंग्लज शहरात वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी रस्त्यासाठी 10 कोटीची मागणी केली आहे. मंत्री मुश्रीफ त्यासाठी प्रयत्नशील आहेत. कुंभार समाजाला सभागृहाचे वचन काही मंडळींनी दिले होते. पण हे वचन राष्ट्रवादीने पुर्ण केल्याचे सांगितले.
माजी नगरसेवक सय्यद यांनी गेल्या निवडणुकीत जनता दलाने वचननाम्यात सर्व समाजाला सांस्कृतिक सभागृह देण्याचे सांगितले होते. त्याचे काय झाले ? असा प्रश्न करत राष्ट्रवादीने मात्र शहरातील विविध समाजासाठी सांस्कृतिक सभागृहासाठी निधी दिला आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने रिंगरोडचा प्रश्न मार्गी लागणार असुन 17 कोटीच्या निधीची आवश्यकता आहे. आतापर्यंत सुमारे 80 कोटीपर्यंत विकासनिधी शहराला दिल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितल्याने जनतेने याचा विचार करावा असे शहराध्यक्ष सिध्दार्थ बन्ने यांनी सांगितले.