जनावरांना पाण्याची सोय : ग्राम पंचायतीतर्फे उपक्रम
वार्ताहर /कुद्रेमनी
जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी तलाव खोदाईचा उद्घाटन कार्यक्रम कुद्रेमनी ग्राम पंचायतीच्यावतीने नुकताच करण्यात आला. गावातील बेरड शेत नाल्यावर उन्हाळय़ात जनावरांना पण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. रोजगार हमी योजनेंतर्गत हे विकासकाम हाती घेतले आहे.
ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून तलाव खोदाईचे उद्घाटन झाले. ग्रा. पं. अध्यक्षा रेणुका नाईक, सदस्य शांताराम पाटील, अरुण देवण, लता शिवणगेकर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. ग्रा. पं. सदस्य शिवाजी मुरकुटे, संजय पाटील, विमल साखरे, आरती लोहार, मल्लव्वा कांबळे, पीडीओ लीला मेस्त्री, सचिव हणमंत किल्लेकर, उल्का जाधव यांच्या हस्ते विविध साहित्याचे पूजन झाले.
यावेळी विनायक पाटील म्हणाले, गावच्या बेरड शेतवडीवरून जाणारा पाण्याचा नाला गावच्या पश्चिम बाजूकडील डोंगराळ भागातून वाहत येतो. पावसाळय़ात तो दुथडी भरून वाहतो. मात्र, हाच नाला उन्हाळय़ात कोरडा पडतो. हा नाला पुढे शिनोळी गावाजवळून वाहत जाऊन उचगाव मार्कंडेय नदीला मिळाला आहे. या ठिकाणी पाण्याचा मोठा साठा झाला तर बाराही महिने या भागातील शेतीला पाणी होईल, अशी स्थिती
आहे.
सध्या गावात बैल, म्हैस, गायीसारख्या जनावरांची संख्या मोठी आहे. उन्हाळय़ात जनावरांना पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झालेली असते. जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यासाठी जनावरांच्या सोयीसाठी हे विकासकार्य हाती घेण्यात येत असल्याची माहिती विनायक पाटील यांनी दिली.
यानंतर ग्रा. पं. सदस्य अरुण देवण, शांताराम पाटील यांनी जनावरांना पाण्याची गरज असल्याचे सांगून या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे नुकसान होणाऱया शेतवडीत मातीचा भराव टाकून बांध मजबूत करण्याचे प्रयोजन असल्याची माहिती दिली. यावेळी ग्रा. पं. सदस्य, कर्मचारी सुरेश शिवणगेकर, चोखोबा कांबळे, प्रकाश कांबळे आदींसह रोजगार महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.









