पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याच्या वाढत्या घटना
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यातील लोलये-पोळे, पैंगीण तसेच अन्य भागांमध्ये बिबटय़ाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली असून बिबटा भर वस्तीत येऊन पाळीव कुत्री तसेच गोठय़ातील जनावरांचा फडशा पाडायला लागला आहे. यापूर्वी आगस, खांडले या भागांतील त्याचप्रमाणे चिपळे, खावट या भागांतील पाळीव कुत्र्यांची शिकार केल्यानंतर सध्या बिबटय़ाने लोलये पंचायत क्षेत्रातील माड्डीतळप येथे आपला वळसा वळविला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दोन दिवसांपूर्वी माड्डीतळप येथील विठ्ठल खरात या दुग्ध व्यावसायिकाच्या गोठय़ातील एका वासरावर हल्ला केल्यानंतर दुसऱया दिवशी आणखी एका वासराला सदर बिबटय़ाने जखमी केले आहे. खरात यांच्या गोठय़ात 40 ते 50 इतकी गायी-म्हशीसारखी जनावरे असून त्यात दुभत्या जनावरांचा समावेश आहे. दुधाच्या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालत असून महिन्याभरापूर्वी त्यांच्या गोठय़ातील तीन वासरांचा बिबटय़ाने बळी घेतला होता. या बिबटय़ाचा बंदोबस्त करण्यासाठी माड्डीतळप येथे अभयारण्य विभागाने सापळा लावावा, अशी मागणी या भागातून होत आहे.









