मडगाव रवींद भवनात विशेष कार्यक्रम
प्रतिनिधी /मडगाव
बिरसा मुंडा हे आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक थोर स्वातंत्र्यसेनानी होते. आज गुरूवार दि. 9 रोजी त्यांची पुण्यतिथी मडगाव रवींद्र भवनात संध्याकाळी 3 वाजता साजरी केली जाणार आहे. या कार्यक्रमाला क्रीडामंत्री गोविंद गावडे हे प्रमुख पाहुणे असतील.
तसेच खास आमंत्रित म्हणून कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाज, आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव मेंग गांवकर व शिक्षण खात्याचे उपसंचालक डॉ. उदय गांवकर उपस्थित राहणार आहेत.
1857 च्या क्रांतीनंतर इंग्रजांनी छोटा नागपूर प्रदेशातील मुंडा आदिवासींच्या शेतजमिनी हिरावून घेतल्या होत्या. त्या परत मिळविण्यासाठी मुंडांचे प्रमुख बिरसा मुंडा ज्यांना ‘सरदार’ म्हटले जात, त्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष सुरू केला. या आंदोलनात्मक लढाईचा बिरसांच्या मनावर मोठा प्रभाव पडला होता. त्यांनी इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या आदिवासी समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक चळवळीला सुरुवात केली. त्यामुळे अनेक मुंडा आदिवासींनी बिरसांबरोबर सरदार आंदोलनात सहभाग घेतला.
इंग्रजाविरूद्ध संघर्ष करणारे ते पहिले स्वातंत्र्यसैनिक होते अशी माहिती उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी पत्रकार परिषदेत दिली. नंतर इंग्रजांनी त्यांना जंगलात एक बैठक चालू असताना अटक केली व रांची येथे कैदेत पाठविले. त्या ठिकाणी त्यांचा अतोनात छळ केला व तेथेच त्यांना वयाच्या 25व्या वर्षी संशयास्पद मृत्यू आला.
आज होणाऱया पुण्यतिथी कार्यक्रमात आदिवासी समाजासाठी योगदान दिलेले सासष्टीतील नेते माजी आमदार स्व. लुईस आलेस कार्दोज, माजी आमदार स्व. आंतोन गांवकर, स्व. जॉन रायकर, साबेस्त्याव मिरांडा, पीटर गामा व आंतोन फ्रान्सिस यांचा मरणोत्तर गौरव केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला आदिवासी समाजातील विद्यार्थी तसेच इतरांची उपस्थित असेल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रकाश वेळीप यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला सतिश वेळीप तसेच दुर्गादास गावडे उपस्थित होते.









