सर्व गुन्हेगार सुन्नी समुदायाशी संबंधित
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणमध्ये एकाच दिवसात 12 कैद्यांना फासावर लटकविण्यात आले आहे. या 12 कैद्यांमध्ये 11 पुरुष अन् 1 महिला कैद्याचा समावेश होता. हे सर्व कैदी बलुचिस्तानचे रहिवासी होते अन् सुन्नी समुदायाशी संबंधित होते. या सर्वांवर अमली पदार्थांची तस्करी किंवा हत्येचा आरोप होता. इराणमध्ये सातत्याने ठोठावल्या जाणाऱया मृत्युदंडामुळे मानवाधिकार संघटनांच्या चिंता वाढल्या आहेत.
सर्व 12 गुन्हेगारांना सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील जाहेदान तुरुंगात फासावर लटकविण्यात आले आहे. इराणमधील हा प्रांत अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे. या 12 जणांपैकी 6 जणांना अमली पदार्थांशी निगडित आरोपांप्रकरणी फासावर लटकविण्यात आले. तर 6 जणांना हत्येप्रकरणी मृत्युदंडाला सामोरे जावे लागल्याचे नॉर्वेमधील इराण ह्युमन राइट्स या संस्थेने सांगितले आहे.
एकाचवेळी 12 गुन्हेगारांना फासावर लटकविण्यात आल्याने इराण सरकारवर टीकेचा भडिमार केला जात आहे. मागील काही वर्षांमध्ये मोठय़ा संख्येत अल्पसंख्याक सुन्नी समुदायाच्या लोकांना फासावर लटकविण्यात येत असल्याचा आरोप सरकारवर आहे. इराण हा देश शियाबहुल आहे. इराणमध्ये जातीय आणि धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात असल्याचे मानवाधिकार कार्यकर्त्यांचे सांगणे आहे. यात विशेषकरून कुर्द, बलूच आणि अरब सामील आहेत.









