परीक्षणात टय़ूमर संपविण्यास 100 टक्के उपयुक्त
किमोथेरपी अन् रेडिएशनची गरज नाही
वैद्यकीय जगतातील एका मोठय़ा यशाने पूर्ण जगाला चकित केले आहे. अलिकडेच रेक्टल कॅन्सरच्या (कर्करोग) काही रुग्णांवर करण्यात आलेल्या वैद्यकीय परीक्षणात डॉस्टरलिमॅब नावाच्या औषधाने कमाल केली आहे. केवळ 6 महिन्यांमध्ये याच्या मदतीने रुग्णांमधील कर्करोग पूर्णपणे गायब झाला आहे. हे संशोधन न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित झाले आहे.
इतिहासात पहिल्यांदाच..
कर्करोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या औषधाने सर्व रुग्ण बरे झाले आहेत असे अध्ययनाचे लेखक डॉ. लुइस ए डियाज यांचे म्हणणे आहे. अध्ययनाचा आकार छोटा असला तरीही आमच्यासाठी या जीवघेण्या आजाराच्या विरोधात मोठे यश आहे. कुठल्याही कर्करोग संशोधनात प्रत्येक रुग्ण बरा होणे खरोखरच मोठी गोष्ट असल्याचे उद्गार युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील डॉक्टर एलन पी. विनूक यांनी काढले आहेत.

सर्व रुग्णांच्या शरीरातील टय़ुमर गायब
या परीक्षणात अमेरिकेत राहणाऱया रेक्टल कॅन्सरच्या 18 रुग्णांना सामील करण्यात आले. हे सर्व जण कॅन्सरच्या समान स्टेजमध्ये होते. वैज्ञानिकांनी त्यांना 6 महिन्यापर्यंत सलग डॉस्टरलिमॅबचा डोस दिला. 12 महिन्यांनी समोर आलेल्या निष्कर्षांमध्ये रुग्णांच्या शरीरामधील टय़ूमर पूर्णपणे गायब झाला होता. त्यानंतर या रुग्णांचे शारीरिक परीक्षण, एंडोस्कोपी, पीईटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन झाले, कुठल्याही परीक्षात टय़ुमर दिसून आला नाही. सर्व रुग्णांनी वैद्यकीय परीक्षणापूर्वी किमोथेरपी, रेडिएशन आणि इनवेसिव्ह सर्जरी यासारखे उपचार करवून घेतले होते. दुष्परिणामांमध्ये त्यांना यूरिन, बॉवेलशी निगडित समस्यांना तोंड द्यावे लागत होते. परंतु कुठल्याही रुग्णामध्ये डॉस्टरलिमॅब औषधाचा दुष्परिणाम दिसून आलेला नाही.
डॉस्टरलिमॅब औषध
डॉस्टरलिमॅब हे प्रयोगशाळेत तयार केले जाणार असून औषध असून ते मानवी शरीरात अँटीबॉडीजचे सब्स्टिटय़ूट प्रमाणे काम करते. कर्करोगाशी लढणाऱया लोकांची इम्युन सिस्टीम अत्यंत कमकुवत होत असल्याने त्यांच्यात अँडीबॉडीजची पातळीही कमी होते. अशा स्थितीत आजाराशी लढण्यासाठी औषधांची गरज भासते. हे औषध एंडोमीट्रियल कॅन्सर बरा करण्यासाठीही वापरले जाते.









